‘अॅप’मुळे डॉक्टरांची मुंबईवारी थांबणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:47 PM2018-01-15T22:47:07+5:302018-01-15T22:48:16+5:30
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) डॉक्टरांच्या नूतनीकरणासाठी ‘मोबाईल अॅप’ सुरू केले आहे. खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी याचे स्वागत केले आहे. या ‘अॅप’मुळे नूतनीकरणासाठी मुंबईची वारी थांबणार असून ‘एमएमसी’ची किचकट कागदोपत्री प्रक्रियाही सुलभ होणार आहे. अशाप्रकारचे ‘मोबाईल अॅप’ सुरू करणारी ‘एमएमसी’ ही देशातील पहिली संस्था ठरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) डॉक्टरांच्या नूतनीकरणासाठी ‘मोबाईल अॅप’ सुरू केले आहे. खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी याचे स्वागत केले आहे. या ‘अॅप’मुळे नूतनीकरणासाठी मुंबईची वारी थांबणार असून ‘एमएमसी’ची किचकट कागदोपत्री प्रक्रियाही सुलभ होणार आहे. अशाप्रकारचे ‘मोबाईल अॅप’ सुरू करणारी ‘एमएमसी’ ही देशातील पहिली संस्था ठरली आहे.
सुमारे एक लाख ४० हजार डॉक्टरांना नोंदणी नूतनीकरणासाठी मुंबई येथील ‘एमएमसी’च्या कार्यालयात दर पाच वर्षांनी जावे लागत होते; शिवाय विविध वैद्यकीय परवानगी घेण्यासाठी स्वत: हजर राहावे लागायचे. याची दखल एमएमसीचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी घेतली. त्यांच्या पुढाकारातून मोबाईल अॅप सुरू करण्यात आले. या अॅपमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात कुठूनही कायमस्वरूपी नोंदणीकरिता वैद्यकीय व्यावसायिकांना अर्ज सादर करणे तसेच आॅनलाईन शुल्क भरणे इत्यादी कामे आता घरबसल्या करता येतील; शिवाय डॉक्टरांना वैद्यकीय परवान्याचे नूतनीकरण आॅनलाईन करता येणार आहे सोबतच सामान्य रुग्णास आपल्या डॉक्टरांची संपूर्ण माहिती एका क्लिकद्वारे उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाला निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यशाळांना (सीएमई) उपस्थित राहिल्याबद्दल किती ‘क्रेडिट पॉर्इंट’ खात्यात जमा झाले, याचीही माहिती या अॅपद्वारे मिळू शकणार आहे. ‘एमएमसी’च्या वेबसाईटवरील माहितीही या अॅपमध्ये दिसणार आहे.