पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:05 PM2018-03-29T23:05:29+5:302018-03-29T23:05:44+5:30
मराठी भाषा ही अभिजात आहेच आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे ही मागणीही योग्य आहे. परंतु केवळ अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी समृद्ध होईल हा गैरसमज आहे. इंग्रजीचा अतिलाड आणि मराठीला ग्लॅमर नाही या पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत पडली असून ती रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत नाही तोपर्यंत मराठीचे दिवस फिरणार नाहीत, असे प्रतिपादन ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठी भाषा ही अभिजात आहेच आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे ही मागणीही योग्य आहे. परंतु केवळ अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी समृद्ध होईल हा गैरसमज आहे. इंग्रजीचा अतिलाड आणि मराठीला ग्लॅमर नाही या पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत पडली असून ती रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत नाही तोपर्यंत मराठीचे दिवस फिरणार नाहीत, असे प्रतिपादन ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, धरमपेठ राजाराम वाचनालय आणि विदर्भ सांस्कृतिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त सर्वोदय आश्रम सभागृहात आयोजित ‘भाषा, अभिजातता आणि आपण’ या विषयावरील परिसंवादाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रमुख अतिथी प्रा. वसंत आबाजी डहाके तर प्रमुख वक्ते म्हणून अॅड. शांताराम दातार, नागेश चौधरी, वसंत त्रिपाठी व डॉ. प्रकाश परब उपस्थित होते. देशमुख पुढे म्हणाले, उद्या विदर्भ वेगळा झाला तर या राज्याची राज्यभाषा कोणती राहील इतका संभ्रम आहे. कारण, भाषेची भेसळच मोठ्या प्रमाणात झाली आहे. मराठीचे अभिजातत्व जपायचे असेल तर मराठी सक्तीचा शिक्षण कायदा करण्यासोबतच ती घराघरात आत्मियतेने बोलली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. डॉ. वसंत त्रिपाठी म्हणाले, कुठल्याही एका भाषेच्या विकासाचा अट्टहास अयोग्य आहे. प्रत्येक भाषेची आपली एक विशेषत: असते. डॉ. प्रकाश परब म्हणाले, शासन आणि समाज दोघांनी मिळून भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी झटले पाहिजे. मुख्यत्चे मराठी भाषेचे प्राध्यापक आणि पत्रकार यांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अॅड. शांताराम दातार यांनी न्यायालयीन कामकाज मराठी भाषेतून व्हायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नागेश चौधरी यांनी प्रमाण भाषेचा आग्रह हा आदिवासी, गोंड आदी जमातींसाठी घातक असल्याचे सांगितले. डॉ. श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षीय भाषणातून भाषा, अभिजातता आणि आपण या तिन्हीचा आढावा घेतला. संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले.