निवडणुकांमुळे भाजपाला ‘राम’ आठवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 04:30 AM2018-12-02T04:30:02+5:302018-12-02T04:30:04+5:30
राममंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याने त्यावर बोलणे योग्य होणार नाही.
नागपूर : राममंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याने त्यावर बोलणे योग्य होणार नाही. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य करावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार चालवित आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या सत्ताकाळात त्यांना राममंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटला नाही. आता तीन महिन्यावर निवडणुका आल्याने मताचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपा व संघाला ‘राम’ आठवल्याची घणाघाती टीका लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी केली.
ख्र्रिश्चन को-आॅर्डिनेशन कमिटी नागपूरतर्फे मेकोसाबाग येथील मैदानावर आयोजित मसीही अधिकार संमेलनात खर्गे बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, काँग्रेसचे सचिव आशिष दुवा, अखिल भारतीय अल्पसंख्य आघाडीचे उपाध्यक्ष अॅड. अली थॉमस, आदी उपस्थित होते.
खर्गे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. महात्मा गांधी यांना हा देश सर्वधर्मियांचा असल्याचे म्हटले होते. डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय दिला. देशाचा कारभार संविधानाच्या माध्यमातून चालावा. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांचीच आहे. संरक्षण करताना कुणाला काहीच मिळाले नाही तरी बलिदानाची तयारी ठेवा.
>मूठभरांचेच भले केले
ख्रिश्चन मिशनरीने शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देशासाठी योगदान दिले आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु आज केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आरोग्य व शिक्षणासाठी तरतूद नाही. भाजपाचा सबका साथ सबका विकासाचा नारा असला तरी मूठभर कार्पोरेट कंपन्याच्या भल्यासाठी केंद्र सरकार धोरणे राबवित असल्याचा आरोप खर्गे यांनी केला.