तिकिटे नसल्याने क्रिकेट शौकिनांची फसगत

By Admin | Published: March 11, 2016 03:21 AM2016-03-11T03:21:35+5:302016-03-11T03:21:35+5:30

क्रिकेट सामन्याचा आनंद लुुटण्यासाठी कुटुंबीय जामठा येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या परिसरात दाखल होतात.

Because of no ticket, cricket fans have been deceived | तिकिटे नसल्याने क्रिकेट शौकिनांची फसगत

तिकिटे नसल्याने क्रिकेट शौकिनांची फसगत

googlenewsNext

सामना जामठ्यात : आॅन लाईन तिकीट विक्री व्हीसीएच्या जुन्या स्टेडियममध्ये !
नागपूर : क्रिकेट सामन्याचा आनंद लुुटण्यासाठी कुटुंबीय जामठा येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या परिसरात दाखल होतात. सामन्याबाबतची सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते. पण तिकिटे उपलब्ध नसल्याचे कळताच त्यांच्या उत्साहावर विरजण पडते. गुरुवारी हे चित्र स्कॉटलंड- झिम्बाब्वे ‘ब’ गट पात्रता सामन्याच्यावेळी व्हीसीए परिसरात पहायला मिळाले. अनेकक्रिकेट चाहते आल्यापावली परत गेले.
सामना जामठ्यात आणि तिकीट विक्री सिव्हील लाईन्स येथील जुन्या व्हीसीए स्टेडियममध्ये असल्याने अनेकांना शहरात परत यावे लागले. १०० आणि २०० रुपयांपासून किंमत असलेली तिकिटे मिळविण्यासाठी दोन तासांचा प्रवास अर्थात सामन्यास मुकण्यासारखेच आहे. २००८ साली जामठ्यात उभारण्यात आलेल्या नव्या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता ४५ हजार इतकी आहे. शहराच्या मधून २० किमीचा प्रवास करण्यासाठी किमान ४० मिनिटे लागतात. आॅटोरिक्षाने त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. तिकीटविक्री जुन्याच स्टेडियममध्ये असल्याने घोळ उत्पन्न झाला. व्हीसीए अधिकाऱ्यांच्या मते दोन्ही स्टेडियमवर तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध ठेवणे शक्य नाही.
देशात तिकीट विक्रीवर बीसीसीआयचे नियंत्रण आहे पण सामनास्थळी तिकीट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी यजमान संघटनेची असल्याने यावर भाष्य करणे बीसीसीआयने टाळले. नागपूरप्रमाणे धरमशाला येथे ‘अ’ गटाचे पात्रता सामने खेळविले जात आहे. तेथे मात्र स्टेडियमच्या गेटवरच तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागपुरात तिकिटे कुठे मिळतील याची माहिती आम्ही स्थानिक वृत्तपत्रांद्वारे दिली असल्याचा दावा व्हीसीएने केला. पण त्यांचा हा दावा फोल असल्याचे मत अनेक क्रिकेट शौकिनांनी व्यक्त केले.
स्टेडियमच्या आत तसा शुकशुकाट आहे. पहिल्या सामन्याच्यावेळी तर बोटावर मोजण्याइतकेच लोक होते. गुरुवारी काही शाळकरी मुलांनी हजेरी लावल्याने परिस्थिती किंचित सुधारली.त्याआधी झिम्बाब्वेचा डाव सुरू झाला तेव्हा शंभरच्यावर लोक नव्हते. शहराबाहेर असलेल्या स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याऐवजी क्रिकेटशौकिन पब किंवा कॅफेत जाऊन सामना पाहण्यास पसंती दर्शवित आहेत.
जे स्टेडियमपर्यंत आले त्यांना तिकीट मिळाले नाही. यामुळे नर्व्हस झालेला एक चाहता म्हणाला,‘ आम्ही क्रिकेटवर प्रेम करीत असल्याने उन्हाचे चटके सोसून २० किलोमीटरवरून आलो. आॅन लाईन तिकीट खरेदी नेटवर्कमुळे यशस्वी होऊ शकली नाही. येथे आलो तर कळले की तिकिटे जुन्या व्हीसीएवर मिळू शकतील. पण गेटवर पैसे मोजून तिकिटे का मिळू शकत नाहीत, असा सवाल कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांनी केला. सामन्याला आधीच तुरळक उपस्थिती असते तरीही तिकीट विक्रीची सोय सामनास्थळी का नाही. जामठा स्टेडियमबाहेर हाच चर्चेचा विषय आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

जामठ्यात सजले हेल्मेटचे स्टॉल्स!
टी-२० विश्वचषकाचे क्रिकेट सामने पहायला येणाऱ्या शौकिनांना विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमबाहेर खिसे मोकळे करावे लागत आहेत. हेल्मेट घेऊन येणाऱ्यांना स्टॉलवर हेल्मेट ठेवण्यासाठी ३० ते ५० रुपये मोजावे लागत आहेत. पोलिसांनी सामना पहायला येणाऱ्या प्रेक्षकांना कुठलीही वस्तू सोबत घेऊन जाण्यास मनाई केली आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू आणि बॅग देखील सोबत घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात येत असून दुचाकीस्वारांना हेल्मेटही वाऱ्यावर सोडून द्यावे लागते. हायवेवर हेल्मेट बंधनकारक असल्याने अनेक दुचाकीस्वार हेल्मेटसह येथे येतात पण सोबत घेऊन जाण्यास बंदी आहे. या संधीचा लाभ घेत जामठा गावातील अनेक तरुणांनी हेल्मेट स्टॉल्स उभारले आहेत. पाच ते सहा स्टॉल्स गुरुवारी सजले होते. या स्टॉलवर हेल्मेट ठेवण्यासाठी ३० ते ५० रुपये आकारले जातात. ज्या दुचाकीस्वारांच्या वाहनांना हेल्मेट लॉक करण्याची सोय नाही, अशांनी पैसे देऊन स्टॉल्सवर हेल्मेट जमा केले. एका हेल्मेट स्टॉलवाल्याकडे ५० च्यावर हेल्मेट दिसले. त्याला विचारताच साडेतीन तास हेल्मेटची राखण करण्याचे हे शुल्क आकारत असल्याचे सांगितले. पण हेल्मेट गहाळ झाल्यास जबाबदारी आपली नसल्याचेही स्टॉलवाल्याने स्पष्ट केले.

Web Title: Because of no ticket, cricket fans have been deceived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.