बुद्ध व्हा... शुद्ध व्हा....!!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:35 PM2018-10-16T22:35:39+5:302018-10-16T22:37:17+5:30
हातात काठी. डोक्यावर निळी टोपी, फाटलेले जोडे, मळकट सदरा नि त्याहून मळकट धोतर ! दीक्षाभूमीवर थांबलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करु न बाबासाहेबांचे विचार सांगणारा ७० वर्षीय वृद्ध. वयाने थकलेला, मात्र मनाने अजूनही तरुण असलेल्या वृद्धाचा हा प्रवास आठ वर्षांपासूनचा आहे. केरूआ तुकाराम शिंदे त्या व्यक्तीचे नाव.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हातात काठी. डोक्यावर निळी टोपी, फाटलेले जोडे, मळकट सदरा नि त्याहून मळकट धोतर ! दीक्षाभूमीवर थांबलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करु न बाबासाहेबांचे विचार सांगणारा ७० वर्षीय वृद्ध. वयाने थकलेला, मात्र मनाने अजूनही तरुण असलेल्या वृद्धाचा हा प्रवास आठ वर्षांपासूनचा आहे. केरूआ तुकाराम शिंदे त्या व्यक्तीचे नाव.
जालना जिल्ह्यातील एका छोटाशा गावातून ते मंगळवारी दीक्षाभूमीला पोहचले. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा बायकोसोबत दीक्षाभूमीला आलो होतो. नंतर संसाराला लागलो. आठ वर्षांपूर्वी पत्नी वारली. तेव्हापासून दरवर्षी येतो. वय झाल्यामुळे घरची मंडळी जाऊ देत नाही, गुपचूप येतो. येथे येऊन आपल्या लोकांची गाठभेट घेतोे. त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची माहिती सांगतो. अशिक्षित असलो तरी ज्या काही चार गोष्टी माहीत आहे त्या सांगतो. शाळा शिकणं म्हणजे बाबासाहेबांची भक्ती करण्यासारखं आहे. लेकरांना शिकवा. त्यांना मोठ करा. त्यांना बाबासाहेब सांगा. बाबासाहेबानं त्याग केला म्हणून आपण सुखी आहोत, असे म्हणत असताना ते भावुक झाले. धोतराने डोळे पुसत त्यांनी ‘बुद्ध व्हा...शुद्ध व्हा’ हे गीत आपल्या कापऱ्या आवाजात गायिले. केरूआ मोठा माणूस नसला तरी बाबासाहेबांच्या विचारांनी त्याचे मन मोठे झाल्याची प्रचिती आल्यावाचून राहात नाही.
दिल्ली येथून आले वालदे कुटुंब
जी व्यक्ती बुद्धाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे वागते, आचरण करते ती स्वत:चा विकास साधू शकते. बुद्धाचे तत्त्वज्ञान जर प्रत्येक नागरिकाने आचरण्याचा प्रयत्न केला तर या जगातील किती तरी दु:खे कमी होतील व विश्वात शांतता नांदेल, असा विश्वास दिनेश वालदे यांनी बोलून दाखविला. धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी वालदे हे सहकुटुंब दिल्ली येथून मंगळवारी दीक्षाभूमीवर पोहचले.
‘लोकमत’शी बोलताना त्यांच्या पत्नी डॉ. नीशा वालदे म्हणाल्या, बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी आहे व नीतिमत्ता त्याचा पाया आहे. त्यातूनच समाजाला वेगळी दिशा मिळू शकते. जो समाज नीतिमान आहे, तो समाज प्रज्ञावंत आहे. तो यशवंत आहे, तो समाज बलवंत आहे, तो समाज धनवंत आहे आणि या सर्व गोष्टी आचरणातूनच निर्माण होणाऱ्या आहेत. बाबासाहेबाच्या या पवित्र भूमीवर आल्यावर एक नवीन ऊर्जा मिळते. ही धम्म चळवळीला समोर नेण्यास मदत करते, असेही त्या म्हणाल्या.