दुसऱ्याचे कागदपत्र देऊन बनला सैनिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 09:52 PM2019-10-02T21:52:36+5:302019-10-02T21:53:34+5:30
दुसऱ्याचे कागदपत्र देऊन एक युवक सैन्यात भरती झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हे प्रकरण पुढे आले. कामठी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुसऱ्याचे कागदपत्र देऊन एक युवक सैन्यात भरती झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हे प्रकरण पुढे आले. कामठी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मनोज दिनेश सालोदरी (२१) रा. भदरोली, उत्तर प्रदेश याच्या नावावर अज्ञात युवकाने कामठीच्या ओसीजेसी ट्रेनिंग कंपनीत सैन्यात भरतीसाठी अर्ज सादर केला होता. त्याची सैनिक म्हणून निवडही झाली होती. त्याचे प्रशिक्षण सुरू झाले. त्याला प्रशिक्षण कालावधीतील वेतनही मिळू लागले. दरम्यान सेनेने आरोपीने सादर केलेल्या कागदपत्रांचा तपास सुरू केला. सैन्याचे पथक कागदपत्रांच्या आधारे उत्तर प्रदेशात पोहोचले. त्यांनी मनोज सालोदरीबाबत चौकशी सुरू केली. त्याच्या घरी पोहोचून सत्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेथे पथकाला सालोदरी भेटला. त्याने सैन्यात भरती झाल्याच्या बाबीचा इन्कार केला. मनोज सालोदरीने आपले शैक्षणिक तसेच इतर कागदपत्र गहाळ झाल्याची माहिती दिली. सैन्य दलाच्या पथकाने त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. सैन्याच्या अधिकाऱ्यांनी आरोपी युवकाची चौकशी सुरू केली. त्याला ताब्यात घेण्याची तयारी केली. त्याची माहिती मिळताच आरोपी ३० सप्टेंबरला दुपारी प्रशिक्षण केंद्रातून पळून गेला. त्यानंतर प्रशिक्षण केंद्राचे सूरजभान मानसिंह यांनी कामठी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी युवकाला सैन्याशी निगडित पार्श्वभूमीचा असल्यामुळे त्याने लेखी आणि शारीरिक परीक्षा सहज उत्तीर्ण केल्याचा संशय आहे. पोलीस आणि सैन्यातर्फे त्याचा तपास सुरू आहे.