बेड फुल्ल, रुग्ण बेहाल, प्रशासन हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:07 AM2021-04-03T04:07:33+5:302021-04-03T04:07:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात दररोज चार हजाराच्या जवळपास सक्रिय रुग्ण सापडत आहेत. परंतु गंभीर रुग्णांसाठी बेड शोधूनही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात दररोज चार हजाराच्या जवळपास सक्रिय रुग्ण सापडत आहेत. परंतु गंभीर रुग्णांसाठी बेड शोधूनही मिळत नाही आहेत. तरीही प्रशासनातर्फे जारी रिक्त बेडची संख्या विचारात घेतली तर नागपुरातील ९ शासकीय आणि ९४ खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचे एकूण २२० आयसीयूचे २५ आणि व्हेंटिलेटरचे केवळ ६ बेड खाली आहेत. यावरूनही नागपुरातील गंभीर परिस्थिती लक्षात येते.
शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनचे एकूण केवळ ७०, आयसीयूचे ६ आणि व्हेंटिलेटरचे केवळ ३ बेड खाली आहेत. अशा परिस्थितीत गरीब कोरोना रुग्णांची स्थिती दयनीय झाली आहे. कारण गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयातील खर्च परवडत नाही. हे सुद्धा नागपुरात मृत्यू संख्या वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. ग्रामीण भागात बुधवारी ३० मृत्यू झाले. यावरून गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना उपचार मिळत नसल्याचे स्पष्ट होते. खासगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडून सर्वात अगोदर ॲडव्हान्समध्ये पैसे जमा केले जात आहेत. त्याची कुठलीही मर्यादा नाही. शासकीय दरानुसार ४ ते ९ हजार रुपये घेतले जाऊ शकतात. परंतु खासगी रुग्णालयात २५ हजार रुपये दर दिवस याप्रमाणे वसूल केले जात आहे. बिल देताना वेगवेगळ्या प्रकारचे दर जोडून दाखविले जात आहेत. एका रुग्णाकडून ५ ते ८ लाख रुपयापर्यंतचे बिल वसूल केले जात आहे. खासगी रुग्णालयातील बिलांवर लक्ष ठेवण्यात मनपा प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.
चौकट
सक्रिय रुग्ण वाढल्याने फजिती
नागपुरात सक्रिय रुग्णांची संख्या ४० हजारावर पोहोचली आहे. यात ९३८७ विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णांना एकत्र केले तर गंभीर रुग्णांसाठी बेड अजिबात खाली नाहीत. पहिल्यांदाच सक्रिय रुग्णांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे.