बेड, ऑक्सिजनची उपलब्धी ठरतेय माणुसकीची भिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:07 AM2021-04-25T04:07:21+5:302021-04-25T04:07:21+5:30
आशिष दुबे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संकटाच्या काळात जनतेच्या मदतीसाठी समाजमाध्यमेही पुढे आली आहेत. सामाजिक कार्याची ...
आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संकटाच्या काळात जनतेच्या मदतीसाठी समाजमाध्यमेही पुढे आली आहेत. सामाजिक कार्याची जाण असणारी मंडळी या काळात समाजमाध्यमांवर मदतीसंदर्भात माहिती देत असून, याचा फायदा रुग्णांना तातडीने मदत मिळविण्यात होत आहे. या संकटाच्या निमित्ताने समाजमाध्यमांच्या सकारात्मक वापराचे दर्शन नागरिकांना घडत आहे.
समाजमाध्यमांवर अशा मंडळींनी वेगवेगळे ग्रुप स्थापन केले आहेत. त्या माध्यमातून बेडची माहिती, ऑक्सिजन सिलिंडरची माहिती, दवाखान्याच्या संदर्भातील मार्गदर्शन केले जात आहे.
...
घटना १ : पारडी परिसरातील एका कुटुंबातील सहा सदस्य संक्रमित झाले. यातील दोन-तीन जणांची प्रकृती तर अधिकच चिंताजनक झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करायचे होते. बराच प्रयत्न करूनही ऑक्सिजन बेड मिळत नव्हता. अखेर त्यांनी ‘कोरोना हेल्प’ नावाने असलेल्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवर मदत मागितली. दोन तासातच त्यांना पारडी रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळाला.
...
घटना २ : कॅन्सरने पीडित असलेली एक व्यक्ती कोरोना संक्रमित झाली. एचआरसीटी व्हॅल्यू लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल होण्यासाठी सुचविले. कुटुंबीयांनी बराच प्रयत्न केला, मात्र बेड मिळत नव्हता. अखेर त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने सोशल मीडियावर मदत मागितली. त्या व्यक्तीला जामठा रुग्णालयात बेड मिळाला.
...
घटना ३ : कळमना येथील एक व्यक्ती संक्रमणाखाली आली. दोन दिवसानंतर ऑक्सिजन लेव्हल कमी व्हायला लागली. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कार्यरत असलेल्या त्यांच्या एका परिचित व्यक्तीने सोशल मीडियावर मदतीची मागणी केली. त्यांचा संदेश वाचून अनेक जण मदतीसाठी पुढे आले तसेच ऑक्सिजन सिलिंडरचीही व्यवस्था केली.
...
अशा फक्त तीनच घटना नसून अनेक घटनांमध्ये सोशल मीडियाची मदत झाली आहे. संक्रमित झालेली मंडळी, त्यांचे परिचित सोशल मीडियावर मदतीची मागणी करतात, तातडीने मदतही मिळते. या संकटाच्या काळात हे समाजमाध्यम अत्यंत प्रभावी ठरले आहे. कुणी बेडसाठी, कुणी औषधीसाठी, कुणी ऑक्सिजन सिलिंडरसाठी या माध्यमांचा आधार घेत आहेत. अनेकांनी या कामासाठी ग्रुप तयार केले असून, ते सेवेसाठी जोमाने कार्यरत आहेत.
मागील २० दिवसात संक्रमण वेगाने वाढले असून, मृत्यूचाही आकडा वाढला आहे. जिल्ह्यात रोज सरासरी ६,५०० ते ७ हजार रुग्ण नव्याने संक्रमित होत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बेड, रुग्णालये कमी पडत आहेत. अनेक रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. त्यांना उपचारासोबतच ऑक्सिजनचीही टंचाई जाणवत आहे. वैद्यकीय उपचारासाठी नाईलाजाने अनेकांना घराबाहेर पडावे लागत आहे. या संकटकाळात सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळेवर मदत मिळत असल्याने दारोदार फिरण्याची वेळ टळत आहे.
...
बाहेरच्या शहरातूनही मदतीची मागणी
नागपूर जिल्ह्यातील रुग्णांच्या मदतीसाठी तयार केलेल्या ग्रुपची लिंक व्हायरल झाली. त्यामुळे नागपूरसह पुणे, औरंगाबाद, अमरावती यासह अन्य जिल्ह्यातील व्यक्तीही यावर जुळले आहेत. तेसुद्धा आपल्या परिचितांच्या तसेच गरज असणाऱ्यांच्या मदतीसाठी ग्रुपवर संदेश पाठवून मदतीची मागणी करीत आहेत. यातून अनेकांना मदत मिळत आहे, तर काहींच्या पदरी मात्र निराशा येत आहे.
...