अंथरुणाला खिळलाय कुटुंबाचा आधारवड
By Admin | Published: April 12, 2015 02:40 AM2015-04-12T02:40:04+5:302015-04-12T02:40:04+5:30
हेमंत हाच एकमेव कुटुंबाचा आधार होता. म्हणून तो दिवस-रात्र कुटुंबाच्या सुखासाठी सारखा पळत होता.
नागपूर : हेमंत हाच एकमेव कुटुंबाचा आधार होता. म्हणून तो दिवस-रात्र कुटुंबाच्या सुखासाठी सारखा पळत होता. पळता-पळता कधी त्याला आजाराने गाठले कळेलच नाही. पण, जेव्हा कळले तेव्हाही तो थांबला नाही. स्वत:च्या आजाराकडे दुर्लक्ष करीत त्याची धावपळ सुरूच होती. परंतु गेल्या दोन वर्षात त्या आजाराने त्याच्या पायातले बळच हिरावून घेतले अन् कुटुंबाचा आधारवड थेट अंथरुणालाच खिळला. नोकरी गमवावी लागली. कुटुंबावर संकट कोसळले.
डॉक्टरांनी ‘हिपजॉईन्ट रिप्लेसमेन्ट’ करण्याचा सल्ला दिला. परंतु जिथे दोनवेळच्या अन्नाची भ्रांत तिथे हा महागडा उपचार परवडणार तरी कसा? आई-वडील मात्र धडपडताहेत त्याला पुन्हा उभा करायला. त्यांच्या या प्रयत्नांना दानशूर समाजाची साथ लाभली तर कदाचित हेमंत पुन्हा उभा होऊ शकेल आपल्या पायावर.
दत्तात्रयनगर रनाळा तहसील कामठी येथील रहिवासी असलेला ३५ वर्षीय हेमंत दिलीपराव देशपांडे त्या युवकाचे पूर्ण नाव. बारावीचे शिक्षण पूर्ण होताच हेमंतने घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. वृद्ध आई-वडिलांसाठी हेमंत हा आधार होता. अपंग आईला मदत व्हावी म्हणून पाच वर्षांपूर्वी त्याने लग्नही केले. त्याला तीन वर्षाची मुलगी आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना त्याला चालताना कंबरेमध्ये त्रास व्हायला लागला. परंतु कामाच्या गराड्यात त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. थातूर-मातूर उपचार सुरू होता. वर्षभरापूर्वी त्याला चालणेही कठीण झाल्यावर वडिलांनी त्याला प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी त्याला तपासल्यावर त्याचे दोन्ही हिपजॉईन्ट खराब झाल्याचे निदान केले.
तत्काळ हिपजॉईन्ट रिप्लेसमेंट करण्याचा सल्लाही दिला. देशपांडे कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहता डॉ. चौधरी यांनी शस्त्रक्रियेचा आणि हॉस्पिटलचा खर्च घेणार नसल्याचे समाजभान दाखविले. परंतु ‘जॉईन्ट रिप्लेसमेन्ट’साठी लागणाऱ्या साहित्याचा साधारण दोन लाखांचा खर्च देशपांडे कुटुंबाला करावयाचा आहे.
देशपांडे कुटुंबीयांसाठी हा खर्च आवाक्याबाहेरचा आहे. शस्त्रक्रियेच्या साहित्यासाठी लागणारा पैसा आड येत असल्याने देशपांडे कुटुंब संकटात सापडले आहे. मुलाला जगवावे तरी कसे, या चिंतेने या गरीब कुटुंबाचे जीणे हराम झाले आहे. समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास हेमंत पुन्हा आपल्या पायावर उभे राहू शकेल, ही एकमेव आशा आहे.(प्रतिनिधी)