ऑनलाइन बेड उपलब्ध, प्रत्यक्षात होते निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:07 AM2021-04-28T04:07:19+5:302021-04-28T04:07:19+5:30

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्णांना सहजपणे उपलब्ध बेडची माहिती कळावी यासाठी नागपूर ...

Beds available online, was actually a disappointment | ऑनलाइन बेड उपलब्ध, प्रत्यक्षात होते निराशा

ऑनलाइन बेड उपलब्ध, प्रत्यक्षात होते निराशा

Next

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्णांना सहजपणे उपलब्ध बेडची माहिती कळावी यासाठी नागपूर महानगरपालिकेने विशेष पोर्टलची निर्मिती केली आहे. परंतु या पोर्टलवर अनेकदा एखाद्या रुग्णालयात बेड उपलब्ध असल्याचे दाखविले जाते. परंतु प्रत्यक्षात तेथे बेड उपलब्ध नसतात. अशा स्थितीत गंभीर रुग्णांच्या नातेवाइकांची उगाच पायपीट होते व उपचाराचा गोल्डन पिरेड वाया जात असल्याचे चित्र आहे. अनेक रुग्णांच्या नातेवाइकांना असे प्रकार अनुभवायला मिळाले असून, यामुळे मनपाच्या या ऑनलाइन अपडेट यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

कोरोनाग्रस्तांना बेड मिळावे यासाठी मनपाने विशेष पोर्टल विकसित केले आहे. यात कोरोनावर उपचार करणारे सरकारी व खासगी इस्पितळांमध्ये किती बेड रिक्त आहेत याची माहिती मिळते. शहरातील १५३ रुग्णालयांचा यात समावेश असून, तेथील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, नॉन-ऑक्सिजन व सामान्य बेडची इत्यंभूत माहिती यात मिळेल, असा दावा मनपातर्फे करण्यात आला होता. सुरुवातीला यावर योग्य माहिती मिळतदेखील होती. मात्र रुग्णालयांची संख्या वाढली आणि यातील माहिती व प्रत्यक्षातील स्थिती यात फरक दिसायला लागला. इस्पितळाच्या माहितीवर क्लिक केले असता तेथे बेड रिक्त असल्याचे दाखविले जाते. मात्र प्रत्यक्षात तेथील बेडवर कधीच रुग्ण दाखल झाला असतो. यामुळे रात्री-बेरात्रीदेखील नागरिकांची धावपळ होत आहे.

अनेकदा रुग्ण गंभीर झाल्यानंतर इस्पितळे हात वर करतात व आयसीयू बेड असलेल्या इस्पितळात दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी ऑनलाइनवर उपलब्ध असलेल्या रुग्णालयात गेल्यावर तेथे नातेवाइकांच्या हाती निराशा लागते.

धावपळीत रुग्णांचा जीव धोक्यात

सोमवारी रात्री २ वाजता प्रतापनगरातील एक रुग्ण गंभीर झाले. पोर्टलवरील माहितीनुसार रुग्णाच्या नातेवाइकांनी वर्धा मार्गावरील दोन इस्पितळांकडे धाव घेतली. मात्र तेथे एकही बेड उपलब्ध नव्हता. अखेर त्यांनी विविध ठिकाणी फोन फिरविले. कोराडी मार्गावरील एका रुग्णालयात एकही आयसीयू बेड उपलब्ध नसल्याचे पोर्टलवर दर्शविले जात होते. मात्र तेथे फोन केला असता बेड उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. या कालावधीत बरेच तास वाया गेले होते. अखेर रुग्णाला जीव गमवावा लागला. अनेक रुग्णांना तर रुग्णवाहिकेतूनच या दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात जावे लागते आणि त्यात प्रकृती आणखी गंभीर असल्याचा धोका असतो.

नेमका दोष कुणाचा

यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मनपातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की या पोर्टलबाबत रुग्णालयांना माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याकडून यात रिक्त बेड्सची माहिती अपडेट होत नाही. त्यामुळे पोर्टलवरील माहिती आणि प्रत्यक्ष स्थिती यात फरक दिसून येतो.

Web Title: Beds available online, was actually a disappointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.