पोळ्याने दिले कोरोनाला आमंत्रण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:12 AM2021-09-07T04:12:02+5:302021-09-07T04:12:02+5:30
कळमेश्वर/ पारशिवनी/ रामटेक/ कामठी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता यंदा बैलपोळा आणि तान्हा पोळा भरविण्यात येऊ नये, ...
कळमेश्वर/ पारशिवनी/ रामटेक/ कामठी :
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता यंदा बैलपोळा आणि तान्हा पोळा भरविण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला वेशीवर टांगत जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी बैलपोळा भरविण्यात आला. यासोबतच काही गावांत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पालन करीत पोळ्याचा सण साजरा केला.
पारशिवनी येथे तकिया मारोती मंदिर परिसरात सोमवारी पोळा भरविण्यात आला होता. शहरात पोळा भरविण्यात येऊ नये, अशी दवंडी नगरपंचायतने दिली होती. मात्र राजकीय सभा, तालुकास्तरावरील शासकीय बैठकांना मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत शांततामय मार्गाने पोळा का साजरा करू नये, असा एक विचारप्रवाह पोळ्याच्या दिवशी शहरात निर्माण झाला. त्यानुसार पारशिवनी येथील तकिया मारोती मंदिर परिसरात शेतकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, रंगीबेरंगी झुल व सजावट केलेल्या बैलजोड्या आणल्या. मंदिरासमोर बैलजोड्या दोन रांगांमध्ये उभ्या करीत पोळा भरविण्यात आला. कळमेश्वर येथील देशमुख ले-आऊट येथे प्रतिबंधात्मक नियमांना बगल देत पोळा साजरा करण्यात आला. कामठी तालुक्यातील लिहिगाव येथे साधेपणाने पोळा साजरा करण्यात आला. सरपंच गणेश झोड यांच्या उपस्थितीत हनुमान मंदिर परिसरात बैलांची पूजा करण्यात आली. रामटेक येथे यंदा नेहरू मैदानावर पाेळा भरला नाही. येथील नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत साधेपणाने पोळा साजरा केला. रामटेक तालुक्यात नगरधन येथे मात्र जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झुगारत पोळा साजरा करण्यात आला.