बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी; संदीप क्षीरसागर यांनी मांडला थरारक घटनाक्रम
By कमलेश वानखेडे | Updated: December 15, 2023 17:18 IST2023-12-15T17:17:50+5:302023-12-15T17:18:12+5:30
आ. संदीप क्षीरसागर यांनी या संबंधीची लक्षवेधी सूचना मांडत या घटनेत समाज कंटकाकडून आपलेही घर जाळण्यात आल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली.

बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी; संदीप क्षीरसागर यांनी मांडला थरारक घटनाक्रम
नागपूर: 30 ऑक्टोबर रोजी बीड शहरात झालेल्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल. या प्रकरणी दोषी असलेल्यांना सोडणार नाही, निश्चित कारवाई करू, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. आ. संदीप क्षीरसागर यांनी या संबंधीची लक्षवेधी सूचना मांडत या घटनेत समाज कंटकाकडून आपलेही घर जाळण्यात आल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली.
माझ्या घरासमोरच पोलीस मुख्यालय आहे. मी पोलिसांना फोन केले पण प्रतिसाद मिळाला नाही. घराच्या गेट बाहेर पोलिसांची गाडी उभी होती पण काहीच केले नाही. या घटनेचा मराठा आंदोलनाशी संबंध नाही. पण यातील आरोपी कुणाशी फोनवर बोलत होते याचा रेकॉर्ड काढला तर यातील मास्टर माईंड समोर येईल. ते सात तास पोलीस कुणाच्या म्हणण्यावर शांत होते, असा सवाल करीत या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी आ. क्षीरसागर यांनी केली.
आ. जयंत पाटील यांनी एवढा मोठा हल्ला होणार आहे हे आधी कसे कळाले नाही, पोलिसांनी हवेत गोळीबार का केला नाही, पालकमंत्र्यांनी स्वतः मागणी करूनही एसआयटी स्थापन का केली नाही, असे सवाल केले. या सर्व घटनेचे समन्वय घडवून आणणारा पप्पू शिंदे हा कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा भाचा आहे, हे जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकरणी २७८ आरोपींना अटक करण्यात आली असून यातील ३० जन सराईत गुन्हेगार आहेत. बीड मधील ६१ आरोपी तर माजलगाव मधील ४० आरोपी अद्याप फरार आहेत. सिसी टीव्ही मध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला त्यांनाच अटक केली आहे. हे सर्व नियोजित होते का हे तपासून पाहिले जात आहे. यातील मास्टर माईंड शोधत आहोत व दोषिवर कारवाई करणारच, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.