बीड पोलिस अधीक्षकांची बदली, आरोपींवर मकोका; CM देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 06:18 IST2024-12-21T06:15:54+5:302024-12-21T06:18:49+5:30
मास्टरमाइंडला सोडणार नाही, प्रकरणाची न्यायालयीन व एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी.

बीड पोलिस अधीक्षकांची बदली, आरोपींवर मकोका; CM देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : बहुचर्चित सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात बीडच्या पोलिस अधीक्षकांची बदली आणि आरोपींविरुद्ध मकोकाची कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच या हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव समोर येत आहे. त्याला मास्टरमाइंड म्हटले जात आहे. त्याचे फोटो कुणासोबतही असू द्या, त्याच्यावर कारवाई हाेईल, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. कराड याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध असल्याने त्याला वाचवले जात असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षाने सभात्याग केला.
सरपंच देशमुख हत्याकांड प्रकरणी विधानसभेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बीड जिल्ह्यात गुन्हेगारांनी अराजकतेचे वातावरण निर्माण केले आहे. वाळू माफिया, भूमाफिया आदी समाजकंटकांचा नायनाट केला जाईल. त्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे.
देशमुख यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत
मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. पोलिस निरीक्षक महाजन यांच्यावर कारवाईच्या मागणीवर त्यांनी सांगितले की, महाजन यांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केल्याचे दिसून येते. सरपंच देशमुख यांच्या कुटुंबीयांनासुद्धा त्यांच्याबाबत कुठलीही तक्रार नाही. त्यामुळे महाजन यांच्यावर कारवाई करून पोलिसांचे मनोधैर्य तोडणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
प्रकरणाचे मूळ आवाडाच्या गुंतवणुकीशी निगडित
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकरणाची मुळे आवाडा ग्रीन एनर्जी कंपनीच्या गुंतवणुकीशी निगडित असल्याचे निदर्शनास आले आहे. कंपनीकडून सक्तीच्या कामाची मागणी केली जात आहे. खंडणीही मागितली जात आहे. सरपंचाचा खून करण्यापूर्वी ६ डिसेंबर रोजी काम करत असताना आरोपींनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली होती. यावेळी सरपंच देशमुख यांनी मध्यस्थी केली होती. यानंतर ९ डिसेंबर रोजी सरपंचाचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली.