वाइनविरुद्ध बियरचा वाद पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:07 AM2021-06-04T04:07:23+5:302021-06-04T04:07:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मद्यविक्रीच्या मुद्द्यावरून वाइन शॉपविरुद्ध बियर बारच्या संचालकांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मद्यविक्रीच्या मुद्द्यावरून वाइन शॉपविरुद्ध बियर बारच्या संचालकांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, बुधवारी सायंकाळी या दोन गटांत चांगलाच ऑनलाइन राडा झाला. शिवीगाळ, धमकी अन् नंतर प्रकरण पोलिसांकडे नेण्याचे ठरले. मात्र, गुरुवारी सायंकाळपर्यंत या संबंधाने आपल्याकडे तक्रार आली नसल्याचे जरिपटका पोलिसांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रेत्यांना काही अटीशर्थी घालून होम डिलिव्हरीच्या नावाखाली मद्यविक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यांना वेळही निर्धारित करून देण्यात आली आहे. वाइन शॉपच्या धर्तीवर बार मालकांना खर्चाचा व्याप लक्षात घेता छापील किमतीत (एमआरपी) मद्यविक्री करणे परवडत नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी बार मालक आणि वाइन शॉपच्या संचालकांची आपसात बैठक झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाइन शॉपचे संचालक विक्री करतील आणि सायंकाळी ५नंतर बियर बारचे संचालक मद्य विकतील, असा निर्णय त्यांनी घेतला. बैठकीच्या या निर्णयाची काही दिवसच प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली. नंतर मात्र वाइन शॉपचे संचालक सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत होम डिलिव्हरीच्या नावाखाली दुकानाच्या आजूबाजूला आपले पंटर उभे ठेवून मद्यविक्री करू लागले. त्यामुळे त्यांचा गल्ला, तर लाखांत जात होता. मात्र, बियर बारकडे ग्राहक फिरकेनासे झाले. अनेक ठिकाणी बियर बार आणि वाइन शॉप आजूबाजूलाच असल्याने त्यांच्यात खटके उडू लागले. लिकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची आठवण करून देऊनही फायदा होत नसल्याने बार संचालक संतापले. या पार्श्वभूमीवर, बुधवारी सायंकाळी जरीपटक्यातील एका बार संचालक आणि वाइन शॉपच्या संचालकांमध्ये फोनवरून जोरदार खडाजंगी झाली. तुम्ही दरदिवशी तीन ते चार लाखांचा गल्ला उचलता आमची बोहणीही होत नाही, असे म्हणत बियर बारवाल्याकडून आगपाखड झाली. नंतर देवानी, राणा, शेरे पंजाबने यात उडी घेतल्यामुळे फोनवरून एकमेकांना शिवीगाळ, धमक्या दिल्या गेल्या. त्यानंतर काही मंडळी एका दुकानावर जाऊन पडली. त्यामुळे आगीत तेल ओतल्यासारखे झाले. हाच प्रकार पाचपावलीतही झाला. त्यानंतर दोन्ही गटांत ऑनलाइन (फोनवरून) वाद झडला. तो गुरुवारी दुपारपर्यंत सुरूच होता.
---
ऑडिओ क्लीप व्हायरल
खडाजंगी आणि शिवीगाळीची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. दोन्ही कडील मोठ्या मंडळींनी त्यानंतर दोन्ही गटांना कानपिचक्या दिल्या. पोलिसांच्या कारवाईच्या परिणामाची जाणीव करून देण्यात आली. त्यानंतर प्रकरण समेटावर आले. त्यामुळे पोलिसांकडे जावे की नाही, यावर निर्णय झाला नाही.
---
दिलगिरीची बैठक
गुरुवारी सायंकाळी या संबंधाने वाइन शॉप आणि बियर बारच्या संचालकांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवीगाळ करणाऱ्यांनी आणि धमकी देणाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली. ‘पिने खाणे मे हो गया. दिल पे मत ले यार’, असे म्हणत ‘रात को बैठते है...’ असा निर्णय घेऊन प्रकरणाला मूठमाती देण्याचे ठरले.
---