बीअर शॉपी की ओपन बार? उपराजधानीतील वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:26 AM2018-05-16T10:26:58+5:302018-05-16T10:27:08+5:30
बीअर शॉपीत फक्त बंद बाटल्यातच बीअर विकण्यास परवानगी आहे. पण उपराजधानीतील अनेक चालकांनी तळीरामांसाठी शॉपीमध्येच बीअर पिण्यासाठी प्लास्टिक ग्लास आणि चकण्याची खास व्यवस्था केली आहे.
मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बीअर शॉपीत फक्त बंद बाटल्यातच बीअर विकण्यास परवानगी आहे. पण अनेक चालकांनी तळीरामांसाठी शॉपीमध्येच बीअर पिण्यासाठी प्लास्टिक ग्लास आणि चकण्याची खास व्यवस्था केली आहे. आर्थिक व्यवहारामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असून शॉपीलगतच्या रहिवाशांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे.
विकत घेतलेली बीअर कुठे प्यावी, हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. घरी घेऊन जाणे शक्य नाही. हॉटेलमध्ये जावे तर मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. या समस्येवर शॉपीचालकांनी तळीरामांची पिण्याची सोय करून त्यावर तोडगा काढला आहे. बीअर शॉपी की ओपन बार, असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. बीअर संपली की जागा सोडा
शॉपीमध्ये वा पायऱ्यांवर बीअर रिचविणाऱ्यांना वेळेचे बंधन असते. बीअर संपली की जागा सोडा, असा आदेश शॉपीच्या नोकराकडून दिला जातो. तळीराम लगेच आदेश पाळतो आणि दुसऱ्यासाठी जागा रिक्त करतो, असे पाहणीदरम्यान आढळून आले. बीअर बारमध्ये एमआरपीपेक्षा दुप्पट दर आकारले जातात. हा आर्थिक भुर्दंड सहन करणे दररोजच ढोसणाऱ्यांना कठिण असल्यामुळे उन्हाळ्यात बीअर शॉपीमध्ये गर्दी वाढली आहे.
शॉपीच्या बोर्डवर कंपन्यांची जाहिरात
नागपूर शहरात ५० च्या आसपास तर जिल्ह्यात एकूण ८२ बीअर शॉपी सुरू आहेत. शहरातील अनेक शॉपीच्या बोर्डवर मद्य कंपन्यांची जाहिरात आहे. कंपन्याची जाहिरात करणे गुन्हा आहे. पण कायदा धाब्यावर बसवून कंपन्यांची जाहिरात करणे सुरूच आहे. काही शॉपींनी जाहिरात पांढऱ्या कपड्यांनी झाकली आहे तर काहींच्या बोर्डवर जाहिरात अजूनही झळकत आहे.
उघड्यावर दारू व बीअर पिणे गुन्हा
उघड्यावर दारू, बीअर पिणे कायद्याने गुन्हा आहे. पण सर्वत्र कायद्याचे उल्लंघन करण्यात येत आहे. मालकांना रिकाम्या बाटल्या, चकण्याच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळत असल्यामुळे उन्हाळ्यात अनेक वस्तीतील बीअर शॉपी तळीरामांनी गजबजलेल्या दिसून येत आहे. पोलिसांनीही या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. आर्थिक व्यवहारामुळे शॉपी चालकांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांची भीती नसल्यामुळे बिनधास्त व सहज बीअर पिता येत असल्याने या शॉपींकडे मोठ्या संख्येत तरुण वर्ग वळत आहे. पोलीस प्रशासन आणि दारुबंदी विभागाने खुलेआम बीअर पिण्याचा परवाना दिला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शॉपीत व बाहेर पायऱ्यांवर अड्डा
उन्हाळ्यात बहुतांश शॉपीमध्ये आणि पायऱ्यांवर बीअर पिण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेक शॉपीने शेड तयार केले आहेत. बहुसंख्य शॉपी वस्तीत वा अपार्टमेंटमध्ये आहेत. नंदनवनच्या एनआयटी क्वॉर्टरमधील दुकानांमध्ये दोन बीअर शॉपी सुरू आहेत. या ठिकाणी सायंकाळी ५ वाजेपासून तळीरामांची गर्दी होण्यास सुरुवात होते. ही गर्दी उत्तरोत्तर वाढतच जाते. असाच प्रकार महाल, सक्करदरा, संगम टॉकीज चौकातील शॉपीमध्ये नेहमीच दिसून येतो. कुणाला काही बोलल्यास तळीराम वाद घालतात. त्यामुळे न बोलणेच बरे, अशी प्रतिक्रिया एक नागरिकाने लोकमतशी बोलताना दिली.
कारवाई सुरू आहे
बारचे स्वरुप झालेल्या बीअर शॉपीवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्यावर्षीही कारवाई करण्यात आली होती.
स्वाती काकडे, नागपूर जिल्हा अधीक्षक,
राज्य उत्पादन शुल्क विभाग.