Instagram नं बनवली जोडी, तू हां कर या, ना कर यारा; एकीने केला भ्रमनिरास अन् दुसरीनं...

By नरेश डोंगरे | Published: June 19, 2023 10:27 PM2023-06-19T22:27:26+5:302023-06-19T22:27:32+5:30

उत्तर नागपुरात एकाच आठवड्यात दोन अशा घटना उजेडात आल्या की या घटनेतील पात्र असलेल्या मुलींनी दुसऱ्या प्रांतात पळून जाऊन घरसंसार थाटल्यानंतरच त्यांच्या पालकांना आपल्या 'लाडली'ची 'इन्स्टा-लव्ह-स्टोरी' कळली

Befriended on Instagram, then 2 girls from Nagpur eloped and got married | Instagram नं बनवली जोडी, तू हां कर या, ना कर यारा; एकीने केला भ्रमनिरास अन् दुसरीनं...

Instagram नं बनवली जोडी, तू हां कर या, ना कर यारा; एकीने केला भ्रमनिरास अन् दुसरीनं...

googlenewsNext

नागपूर : सुपरस्टार अमिताभ बच्चन, रेखा, शशी कपूर आणि परवीन बॉबी, अशी त्यावेळीची तगडी स्टारकास्ट असलेला ‘सुहाग’ हा चित्रपट १९७९ ला झळकला. सुपरहिट झालेल्या या चित्रपटातील 'तेरी रब ने बना दी जोडी... हो तेरी रबने -'... हे गीत त्यावेळी खूप गाजले. अनेकदा या गाण्याचा रेफरन्स लग्न जुळवल्यावर दिला जातो. मात्र, सध्या डिजिटल युग असून या काळात अनेक कामे, व्यवहार ऑनलाइन पद्धतीने केले जातात. अगदी विदेशात बसलेली बहीण आपल्या भावाला ऑनलाइन पद्धतीने राखी बांधते अन् पूजापाठही ऑनलाइन पद्धतीने करवून घेतली जाते. आजची युवा पिढी आता त्यांचे जोडीदार (लाइफ पार्टनर)सुद्धा फेसबूक, इन्स्टावरच निवडते. हे करताना ज्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, वाढवले, त्यांना त्यांच्या निर्णयाची साधी चाहूलही लागू देत नाही.

उत्तर नागपुरात एकाच आठवड्यात दोन अशा घटना उजेडात आल्या की या घटनेतील पात्र असलेल्या मुलींनी दुसऱ्या प्रांतात पळून जाऊन घरसंसार थाटल्यानंतरच त्यांच्या पालकांना आपल्या 'लाडली'ची 'इन्स्टा-लव्ह-स्टोरी' कळली. नंतर उघड झालेल्या घटनाक्रमाने त्यांना आकाशातून खाली फेकावे तसे झाले.

प्रकरण : एक

तारुण्यात आलेली लाडकी अचानक बेपत्ता झाल्याने तिचे आई-वडील, काका-मामा सारेच हादरले. कुणी पळवले असेल, कुठे पळवले असेल, ती सध्या काय करत असेल, कुण्या स्थितीत असेल. तिचे काही बरेवाईट तर झाले नसेल, अशा अनेक शंका-कुशंकांनी जन्मदात्यांचा जीव टांगणीला लागला. तक्रार झाल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करून पालकांच्या मदतीने पोलिस त्या मुलीचा शोध घेऊ लागले. तिचा मोबाइलही संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. अखेर तिचे इन्स्टा अकाउंट तपासल्यानंतर धागा मिळाला. ती उज्जैन (मध्य प्रदेश) जिल्ह्यातील तरुणाच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस तेथे पोहोचले. तिने मात्र पोलिसांच्या हातावर आपले लग्नाचे फोटो, मॅरेज सर्टिफिकेट ठेवून नागपूरला परत येण्यास नकार दिला. येथे आपण सुखी आहोत. परत नेण्यासाठी जोरजबराई केल्यास परिणाम चांगला होणार नाही, असा निरोपही आई-वडिलांना देण्यासही सांगितले. तिचा तेथील पोलिस ठाण्यात तयार करण्यात आलेला तिच्या निरोपाचा व्हिडीओ पाहून आई-वडील आणि अन्य नातेवाइकांची जी स्थिती झाली, ती शब्दबद्ध करणे कठीण आहे.

प्रकरण : दोन
या प्रकरणातील मुलगी सधन कुटुंबातील असून केवळ १६ वर्षांची आहे. ती अचानक बेपत्ता झाली तेव्हा तिच्या आई-वडील अन् आजीच्या काळजाचे ठोकेच चुकले. काही दिवसांनंतर ती दिल्लीला एका झोपडपट्टीत सापडली. गरीब, हाडकुळ्या, बेरोजगार तरुणासोबत इन्स्टावर ओळख झाल्यानंतर ती येथून पळून गेली अन् तिकडे लग्न केले. पोलिस अन् नातेवाईक तेथे पोहोचल्यानंतर ती काही केल्या येथे यायला तयार नव्हती. मात्र, कायद्यामुळे ती विवश होती. अल्पवयीन असल्याने पालकांच्या तक्रारीवरून तिला आणि तिच्या पतीला पोलिसांनी नागपुरात आणले. अपहरणासोबतच प्रियकर आता बलात्काराचा आरोपी बनणार असल्याचे लक्षात आल्याने ती 'आऊट ऑफ कंट्रोल' झाली अन् त्याच्यावर कारवाई केली तर याद राखा, अशी धमकीच तिने पालकांना दिली. वैद्यकीय तपासणीलाही स्पष्ट नकार दिला. येथे पालकांसोबत पोलिसही हतबल झाले अन् त्या तरुणाची जामिनावर सुटका झाली. तो एवढा गरीब की दिल्लीला परत जातानाचे रेल्वेचे तिकीटही पोलिसांनी त्याला आपल्या पैशाने काढून द्यावे लागले.

Web Title: Befriended on Instagram, then 2 girls from Nagpur eloped and got married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.