नागपुरात रस्त्यावर वाढली भिकाऱ्यांची वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:40 AM2020-06-15T11:40:33+5:302020-06-15T11:41:00+5:30
गेल्या अडीच महिन्याहून अधिक काळापासून आपल्या निवाऱ्यात बसून असणारे भिकारी पुन्हा रस्त्यांवर सक्रिय झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या टाळेबंदीत शिथिलता येताच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. हे बघून शहरातील भिकारीही सक्रिय झाले असून भीक मागण्यासाठी पुन्हा गजबज वाढू लागली आहे. मात्र यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या अडीच महिन्याहून अधिक काळापासून आपल्या निवाऱ्यात बसून असणारे भिकारी पुन्हा रस्त्यांवर सक्रिय झाले. स्वत:च्या पाल्याला कडेवर घेऊन या भिकारी स्त्रिया इतर नागरिकांकडून पैसे देण्यासाठी विनवणी करताना दिसत आहेत. एखाद्या व्यक्तीच्या अंगाला हात लावून हे भिकारी भीक मागत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भौतिक दूरता राखणे गरजेचे आहे. पण हे भिकारी चौकातील दुचाकी व चारचाकी वाहनांपुढे येऊन उभे होतात. काही पैसे द्या, अशी याचना करीत दुचाकीस्वाराच्या पाया पडतात, चारचाकी वाहनांच्या खिडक्यांवर हात ठेवून ठकठक करत असतात. त्यामुळे भीतीपोटी का होईना नागरिक लगेच आपल्या खिशात हात घालतात आणि हाती लागतील तेवढे पैसे देऊन टाकतात. मध्यंतरी कोरोनामुळे एका मृत्यू झाला होता. हे भिकारी रस्त्यावर मास्क परिधान न करता फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. प्रशासनाने यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.