नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात सरकारच्या कामाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 03:28 PM2019-12-17T15:28:29+5:302019-12-17T15:28:53+5:30
राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या सरकारने कामाला सुरूवात केली असून, पुढील काळात त्याचे श्रेय घेता यावे, या एकमेव हेतूने भारतीय जनता पक्ष विधानसभेत गोंधळाचे राजकारण करीत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या सरकारने कामाला सुरूवात केली असून, पुढील काळात त्याचे श्रेय घेता यावे, या एकमेव हेतूने भारतीय जनता पक्ष विधानसभेत गोंधळाचे राजकारण करीत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण यांनी केली आहे. शेतकऱ्यांप्रती फार कळवळा असल्याचे भाजप भासवत असला तरी तो साफ खोटा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना आ. चव्हाण यांनी शेतकऱ्यांबाबत भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, मागील पाच वर्षे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली. भाजपने शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणा केल्या. त्याची योग्य अंमलबजावणी केली नाही. अजूनही राज्यातील लाखो शेतकरी बोंडअळीची मदत, पीक विम्याची भरपाई आणि कर्जमाफी योजनेपासून वंचित आहे. आज ते शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणत आहेत. मात्र, त्यांच्या सरकारच्या काळात झालेली फसवणूक पाहता त्यांना शेतकऱ्यांच्या मुद्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
महाविकास आघाडीच्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची त्यांनी पाहणीही केली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात कामाला सुरूवात झालेली आहे. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा त्यात लक्ष घातले आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू असल्याने हे आमच्याच प्रयत्नांमुळे घडत असल्याचे चित्र रंगवण्यासाठी आणि पुढील काळात त्याचे श्रेय घेण्यासाठी भाजपने आटापिटा सुरू केल्याचे आ. अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.