‘एम्स’च्या ओपीडीला सुरुवात : रोज ४० ते ६० रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 01:15 AM2019-09-15T01:15:01+5:302019-09-15T01:16:54+5:30
बहुप्रतीक्षेत असलेल्या व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सोमवारपासून बाह्यरुग्ण विभागही (ओपीडी) रुग्णसेवेत आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुप्रतीक्षेत असलेल्या व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. मिहान येथील २०० एकरमध्ये एमबीबीएसच्या १५० विद्यार्थ्यांचे वर्ग व वसतिगृह सुरू झाले असून, सोमवारपासून बाह्यरुग्ण विभागही (ओपीडी) रुग्णसेवेत आले आहे. विशेषत: ‘ओपीडी’ला सुरुवात होत नाही तोच रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.
नागपूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मिहान येथे ‘एम्स’च्या इमारतींचे बांधकाम अद्यापही सुरू आहे. परंतु वर्गखोल्या, मुला-मुलींचे वसतिगृह, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था व ‘ओपीडी’च्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यामुळे मेडिकलमध्ये गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या ५० विद्यार्थ्यांच्या एमबीबीएसचे वर्ग आता मिहानमध्ये सुरू झाले आहे. त्यांच्या निवासाची सोयही मिहानमधील वसतिगृहात करण्यात आली आहे. यावर्षी ‘एम्स’ने एमबीबीएसच्या १०० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. यातील एका विद्यार्थ्याने ऐनवेळी दुसºया ठिकाणी प्रवेश घेतल्याने एक जागा अद्यापही रिक्त आहे. त्यांचेही वर्ग आता नियमित झाले आहेत.
ओपीडीत औषधांपासून ते चाचण्यांची सोय
‘एम्स’च्या संचालक, मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ९ सप्टेंबरपासून मिहान येथे बाह्यरुग्ण विभागाला सुरुवात करण्यात आली आहे. रोज साधारण ४० ते ६० च्या दरम्यान रुग्ण येतात. ही ‘डे-केअर’ सेवा आहे. यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णसेवा दिली जात आहे. येथे येणाºया रुग्णांसाठी आवश्यक औषधी व चाचण्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता टप्प्याटप्प्याने ‘ओपीडी’चा विकास केला जाईल, असेही डॉ. दत्ता यांनी सांगितले.
बस व सायकलची व्यवस्था
एम्सचा परिसर हा २०० एकरमध्ये पसरलेला आहे. वसतिगृहापासून ते कॉलेज दूर आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. एमबीबीएसच्या प्रथम बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा व इतर सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या वर्षाच्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळासारख्या आवश्यक सोयी नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत उपलब्ध होतील. ‘कॅम्पस’मध्ये विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी सायकली आहेत. या परिसरात विद्यार्थ्यांच्या दुचाकींना बंदी आहे, असेही डॉ. दत्ता म्हणाल्या.