विद्यापीठात अखेर सामुदायिक प्रार्थनेला सुरुवात

By Admin | Published: May 12, 2016 02:59 AM2016-05-12T02:59:45+5:302016-05-12T02:59:45+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मध्ये सायंकाळच्या सुमारास अचानक ‘अतिउच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार ..

The beginning of community prayer at the university finally | विद्यापीठात अखेर सामुदायिक प्रार्थनेला सुरुवात

विद्यापीठात अखेर सामुदायिक प्रार्थनेला सुरुवात

googlenewsNext

राष्ट्रसंतांच्या विचारांच्या प्रसारासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार: दर गुरुवारी राबविणार उपक्रम
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मध्ये सायंकाळच्या सुमारास अचानक ‘अतिउच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो ना हम रहे अपने लिये हमको सभीसे गर्ज है’ हे सूर घुमू लागले अन् एरवी या वेळेला घरी जाणारी पावले आपसूकच थांबली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी रचलेल्या प्रार्थनेतील एकेक ओळ विद्यार्थ्यांना एकत्र आणत होती अन् प्रत्येक उपस्थिताचे हृदय आध्यात्मिक भावनेने ओथंबून गेले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नागपूर विद्यापीठाला नाव असतानादेखील त्यांची शिकवण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी फारसे प्रयत्न करण्यात येत नव्हते. परंतु तुकडोजी महाराज अध्यासनातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला अन् सर्वधर्मसमभाव, समता, बंधुता आणि राष्ट्रीय भावना जागृत करणाऱ्या सामुदायिक प्रार्थनेचे सूर निनादू लागले. दर गुरुवारी ‘कॅम्पस’मधील ग्रामगीता भवनात सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन होणार आहे.
नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव दिल्यानंतर विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन निर्माण झाले. महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार आणि साहित्याचे संशोधन व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या अनुदानातून ग्रामगीता भवनदेखील साकारले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा विषयाचे एम ए चे वर्गही ग्रामगीता भवनात सुरू आहेत. परंतु नागपूर विद्यापीठ प्रशासनाच्या अनास्थेमुळे विद्यार्थ्यांपर्यंत राष्ट्रसंतांचे विचार पोहोचविणाऱ्या विधायक उपक्रमांचे आयोजनच होत नव्हते. ग्रामगीता भवनाचे उद्घाटन झाल्यानंतरदेखील तिथे कुठलेही आयोजन झाले नव्हते. ‘लोकमत’ने या बाबीवर प्रकाश टाकल्यानंतर तुकडोजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री गुरुदेव भजन प्रभात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु नियमितपणे विधायक कार्यक्रमाचे आयोजन होत नसल्याने विद्यार्थीच अस्वस्थ होते. यातूनच विद्यार्थ्यांनी एकत्र येत त्यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त सामुदायिक प्रार्थनेचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला व मागील आठवड्यापासून त्याची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी सुरू झाली.
डॉ. गोपाल हजारे यांच्या पुढाकाराने विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी ग्रामगीता भवनात एकत्र येऊन प्रथम मौन प्रार्थना नंतर मंगल स्तवन, प्रार्थना व राष्ट्रवंदनेचे पठन केले. यावेळी विभागप्रमुख डॉ.प्रमोद मुनघाटे हेदेखील उपस्थित होते. सध्या वेगवेगळ्या वादग्रस्त कारणांनी विद्यापीठ गाजत असताना नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद आदर्श निर्माण केला आहे. (प्रतिनिधी)

ग्रामगीता भवन तरुणांचे प्रेरणास्थान करणार
विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन दर गुरुवारी होणार आहे. ग्रामगीता भवन हे विद्यापीठातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील तरुणांचे प्रेरणास्थळ व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मत डॉ.प्रमोद मुनघाटे यांनी व्यक्त केले. ग्रामगीता भवनात सुसज्ज ग्रंथालय, संशोधनाच्या सोयी या बरोबरच महाराजांच्या जीवनावरील कायमस्वरूपी दृकश्राव्य प्रदर्शनी होणार आहे. महाराजांच्या जीवन, कार्य आणि साहित्यावरील विविध स्पर्धा, पथनाट्ये, कलापथके, युवकांची शिबिरे, शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा येत्या सत्रापासून आयोजित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The beginning of community prayer at the university finally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.