पीक कर्जाच्या नूतनीकरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:07 AM2021-06-25T04:07:57+5:302021-06-25T04:07:57+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : स्थानिक बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे पीक कर्जाचे नूतनीकरण करण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : स्थानिक बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे पीक कर्जाचे नूतनीकरण करण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, या बँकेचे शाखा व्यवस्थापक वैद्यकीय रजेवर गेल्याने तसेच त्यांच्या जागी पर्यायी व्यवस्था न केल्याने या बँकेतील नवीन पीक कर्ज मंजुरी व कर्ज नूतनीकरण प्रक्रिया आठवडाभरापासून रखडली हाेती.
पेरणी आटाेपत येत असताना नांद (ता. भिवापूर) येथील तसेच परिसरातील गावांमधील शेतकरी बँक ऑफ महाराष्ट्रच्या नांद शाखेत पीक कर्ज घेण्यासाठी तसेच नूतनीकरणासाठी हेलपाटे मारत हाेते. वारंवार विनंती करूनही बँक व्यवस्थापन पीक कर्ज मंजुरी प्रक्रियेला दिरंगाई करीत असल्याने यासंदर्भात लाेकमतमध्ये ‘पेरणी आटाेपली, पीक कर्जाची प्रतीक्षा कायम’ या शीर्षकाखाली मंगळवारी (दि.२२) वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची बँक व्यवस्थापनाने तातडीने दखल घेत मंगळवारपासून नवीन पीक कर्ज मंजुरी व नूतनीकरण प्रक्रिया सुरू केली.
विशेष म्हणजे, बहुतांश कर्जदार शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करीत कर्जाचा भरणा केला. दाेन दिवसात नूतनीकरण हाेऊन कर्जाची रक्कम हाती येईल, अशी त्यांना आशा हाेती. मात्र, शाखा व्यवस्थापक वैद्यकीय रजेवर गेल्याने ताेच त्यांच्या जागी पर्यायी व्यवस्था करण्यात न आल्याने कर्ज नूतनीकरणासाेबत नवीन पीक कर्ज मंजुरी प्रक्रिया थांबली हाेती. त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्तापही सहन करावा लागला. लाेकमतमध्ये वृत्त प्रकाशित हाेताच बँक व्यवस्थापनाने पर्यायी व्यवस्था केली आणि ही प्रक्रिया मंगळवारपासून सुरू केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
...
‘थम्ब लाॅगीन’ प्रणाली
बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाेकमतच्या बातमीची दखल घेत नांद शाखेत तातडीने काही काळासाठी नवीन शाखा व्यवस्थापकाला पाठविले. प्रभारी शाखा व्यवस्थापकाने ‘थम्ब लाॅगीन’ प्रणालीद्वारे पीक कर्ज मंजुरी व नूतनीकरणाला सुरुवात केली. मंगळवार, बुधवार व गुरुवारी बहुतांश शेतकऱ्यांची प्रलंबित कर्जप्रकरणांना मंजुरी दिल्याचे तसेच त्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा झाल्याचे शेतकऱ्यांशी केलेल्या चर्चेवरून निदर्शनास आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकार दिल्याने पीक कर्ज मंजुरी प्रक्रियेला वेग आल्याची माहिती प्रभारी शाखा व्यवस्थापकांनी दिली.