‘डी.फार्म.’च्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:09 AM2021-07-27T04:09:13+5:302021-07-27T04:09:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे बारावीनंतरच्या ‘डिप्लोमा’ अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात ‘डी.फार्म.’, ‘डिप्लोमा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे बारावीनंतरच्या ‘डिप्लोमा’ अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात ‘डी.फार्म.’, ‘डिप्लोमा इन सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी’, ‘डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेन्ट अॅन्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी’ या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी २ ऑगस्टपर्यंत ‘ऑनलाइन’ अर्ज दाखल करता येणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अद्याप सीबीएसई व राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचे निकाल जाहीर झालेले नाहीत. अशा स्थितीत विद्यार्थी अर्ज कसे भरतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर विभागात ‘डी.फार्म’ची ३८ महाविद्यालये असून, तेथे २ हजार ३३१ जागा आहेत. तर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेन्ट अॅन्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी’च्या एका महाविद्यालयात ६० जागा आहेत. बारावीत ३५ टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेला विद्यार्थी या अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी पात्र आहे. विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाऊन ‘ऑनलाइन’ अर्ज दाखल करायचा आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार २ ऑगस्टपर्यंत विद्यार्थी अर्ज दाखल करु शकणार आहेत. याच तारखेपर्यंत विद्यार्थी कागदपत्रांची पडताळणीदेखील करवून घेऊ शकणार आहेत. १० ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल; परंतु सद्यस्थितीत बारावीचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना निश्चितपणे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज दाखल करणे: २ ऑगस्टपर्यंत
कागदपत्रांची पडताळणी : २ ऑगस्टपर्यंत
तात्पुरती गुणवत्ता यादी : ५ ऑगस्ट
आक्षेप: ६ ते ८ ऑगस्ट
अंतिम गुणवत्ता : १० ऑगस्ट