संघाच्या राष्ट्रीय समन्वय बैठकीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:11 AM2021-09-04T04:11:45+5:302021-09-04T04:11:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशपातळीवरील दोन दिवसीय समन्वय बैठकीला शुक्रवारी नागपुरात सुरुवात झाली. रेशीमबाग स्मृतिमंदिर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशपातळीवरील दोन दिवसीय समन्वय बैठकीला शुक्रवारी नागपुरात सुरुवात झाली. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात आयोजित या बैठकीच्या पहिल्या दिवशी संघ परिवारातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींकडून आढावा घेण्यात आला. तसेच विविध नियोजित उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सर्व सहसरकार्यवाह व राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास बैठकीला सुरुवात झाली. एकत्रित बैठकीप्रमाणे संघटनानिहाय विविध पदाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. वर्षभरातील कामगिरी, कोरोनाकाळातील विविध उपक्रम, संघटनविस्ताराची नेमकी स्थिती, यांची रुपरेषा विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. विविध संघटनांमधील समन्वय वाढीस लागावा, यासंदर्भात सरकार्यवाहांनी मार्गदर्शन केले. राजकीय विषयांवरील चर्चा या बैठकीत टाळण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी संघटनांकडून देशातील सध्याच्या स्थितीवर प्रतिनिधींकडून मत विचारात घेण्यात येण्याची शक्यता आहे.
जनतेत जाण्याच्या सूचना
संघ परिवारातील काही संघटना या एका चौकटीतच मर्यादित आहेत. या संघटनांनी विस्तारावर भर देऊन जास्तीत जास्त प्रमाणात जनतेमध्ये जाण्यावर भर द्यावा, अशी सूचना संघाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी केली. संघटन विस्ताराच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवून त्यादृष्टीने नियोजन करण्यास सांगण्यात आले.
तालिबानबाबत व्यक्त केली चिंता ?
संघ या बैठकीत तालिबानसंदर्भात काय भूमिका मांडणार, याकडे अनेकांचे लक्ष होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या या घडामोडींबाबत प्रास्ताविकादरम्यान चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र, यावर जास्त चर्चा झाली नाही. यासंदर्भात संघाकडून कुणीही अधिकृत दुजोरा दिला नाही.