संघ मुख्यालयाच्या रेकीमागे होता आत्मघाती हल्ल्याचा डाव; पाकिस्तानातून दिले जात होते निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 08:55 PM2022-01-08T20:55:56+5:302022-01-08T20:56:50+5:30
Nagpur News संघ मुख्यालय आणि रेशीमबाग परिसरासह अनेक संवेदनशील स्थळांची रेकी करून घेण्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा आत्मघाती हल्ल्याचा डाव होता, अशी माहिती पुढे आली आहे.
नागपूर : संघ मुख्यालय आणि रेशीमबाग परिसरासह अनेक संवेदनशील स्थळांची रेकी करून घेण्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा आत्मघाती हल्ल्याचा डाव होता, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, रेकी करणाऱ्या जैश ए मोहम्मदचा हस्तक रईस अहमद असाद उल्ला शेख (वय २६) याला चौकशीसाठी नागपुरात आणले जाणार आहे.
जैशच्या हस्तकाने कश्मीरमधून येऊन नागपुरात तीन दिवस मुक्काम ठोकला आणि येथील संवेदनशील स्थळांची रेकी केल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
या संबंधाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी निवडक पत्रकारांशी चर्चा केली. त्यात त्यांनी काही मुद्द्यांचा खुलासा केला.
रईस याला जैश ए मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर उमर याने नागपुरात पाठविले होते. त्यानुसार श्रीनगर वरून मुंबई आणि मुंबईहून नागपूर असा प्रवास करीत इंडिगोच्या विमानाने रईस १३ जुलैला नागपुरात आला होता. येथील एका हॉटेलमध्ये त्याने मुक्काम ठोकला. येथून तो १४ तारखेला ऑटोने संघ मुख्यालय परिसरात पोहोचला. तेथील कडक सुरक्षा व्यवस्था पाहून चित्रीकरण करण्याची त्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे तो रेशीमबाग परिसरात पोहोचला आणि ग्राउंडवरून आजूबाजूच्या परिसराचे त्याने फोटो, तसेच व्हिडिओ काढले.
पाकव्याप्त काश्मिरात नवापूर येथे जैश ए मोहम्मदचे लाँचिंग पॅड आहे. जैशचा ऑपरेशन कमांडर उमर याला रईसने व्हिडिओ, फोटो पाठविले. मात्र, ते सुस्पष्ट नसल्याचे सांगून उमरने त्याला अधिक जवळून व्हिडिओ काढण्याची सूचना केली. जवळ गेल्यास सुरक्षा यंत्रणाचे जवान पकडू शकतात, हा धोका लक्षात आल्याने रईसने ते शक्य नसल्याचे उमरला सांगितले. उमर रईसवर दबाव आणत होता. तो वारंवार फोन करीत असल्यामुळे रईस प्रचंड दडपणात आला होता. त्याने नेटवर्क नसल्याचे सांगून आपला मोबाईल बंद केला आणि हॉटेलमध्ये जाऊन झोपला.
फोन सुरू करताच पुन्हा दबावतंत्र सुरू झाल्यामुळे रईस एका मशिदीत गेला. तेथे त्याने मौलवीकडून एक ताविज घेतला आणि हॉटेलमध्ये परतला. तिसऱ्या दिवशी १५ जुलैला नागपूर ते दिल्ली आणि दिल्ली ते श्रीनगर असा इंडिगोच्या विमानाने प्रवास करीत रईस कश्मीरमध्ये पोहोचला. दरम्यान, अशी काहीतरी गडबड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. आम्ही या प्रकरणाची बारीक-सारीक माहिती पाच महिन्यांपासून काढत आहोत. तशी माहिती यापूर्वीच केंद्रीय यंत्रणांना आम्ही दिली होती, असे शनिवारी आयुक्त म्हणाले. काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या हाती रईस अहमद लागला आणि चौकशीत त्याने नागपुरात रेकी केल्याचे पुढे आले. त्यामुळे आमचे तपास पथक श्रीनगरला गेले होते. तेथे या पथकाने रईसची चौकशी केली. त्याला योग्य वेळी नागपुरात चौकशीसाठी आणले जाईल, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.