लसीकरणात रामटेक तालुका मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:09 AM2021-05-18T04:09:29+5:302021-05-18T04:09:29+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी काेराेना प्रतिबंधक लसीकरण हा उत्तम उपाय असला तरी रामटेक तालुक्यात या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी काेराेना प्रतिबंधक लसीकरण हा उत्तम उपाय असला तरी रामटेक तालुक्यात या माेहिमेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. तालुक्यात साेमवार (दि. १७)पर्यंत ४५.८० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. ग्रामीण भागात लस घेण्याबाबत नागरिकांमध्ये अनास्था असल्याने प्रशासनाला जनजागृतीसाेबतच नागरिकांची मनधरणीही करावी लागत आहे.
काेराेना प्रतिबंधक लसीबाबत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कमालीचा गैरसमज निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आदिवासीबहुल गावांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. ही गैरसमज व भीती दूर करण्यासाठी तहसीलदार बाळासाहेब मस्के, खंडविकास अधिकारी प्रदीप ब्रह्मनाेटे, तालुका आराेग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार यांच्यासह इतर अधिकारी गावागावात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. शिवाय, त्यांना या लसीकरणाचे महत्त्व व काेराेनाची घातकता समजावून सांगत आहेत. या लसींसंदर्भात साेशल मीडियावर फिरणाऱ्या संदेशांसाेबत चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही हे अधिकारी करीत आहेत.
या अधिकाऱ्यांनी आजवर ३० गावांना भेटी दिल्या आहेत. रामटेक तालुक्यात २५ हजार लोकांना लसीकरण करण्यात आले. या लसीचा संपूर्ण प्राेटाेकाॅल पाळला जात आहे. लस घेतल्यानंतर कुणालाही त्याचे साईड इफेक्ट दिसून आले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी साेशल मीडियावरील संदेशावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांच्या जवळच्या लस घेतलेल्या व्यक्तींवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतरही नागरिकांनी मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासह अन्य उपाययाेजनांचे पालन करणे आवश्यक असल्याची माहिती आराेग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
...
उमरेड तालुका अव्वल
काेराेना प्रतिबंधक लसीकरणामध्ये नागपूर जिल्ह्यात उमरेड तालुका अव्वल असून, रामटेक तालुक्याचा क्रमांक १३ वा म्हणजे शेवटचा आहे, अशी माहिती आराेग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. रामटेक तालुक्याची लाेकसंख्या १,५१,४१७ असून, ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या ३० टक्के म्हणजेच ४५,४२५ आहेत. यातील २०,४९५ नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लसीचा पहिला तर ४,७२१ नागरिकांनी दुसरा डाेस घेतला आहे. उर्वरित २४,६२० नागरिकांनी लस घेतलेली नाही. पहिला डाेस घेणाऱ्यांचे प्रमाण ४५.८० टक्के तर दुसरा डाेस घेणाऱ्यांचे प्रमाण २२ टक्के आहे. दुसऱ्या डाेसमधील अंतर वाढविण्यात आल्याने हे प्रमाण कमी आहे.
...
ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लसीचे काेणतेही साईड इफेक्ट दिसून आलेले नाहीत. नागरिकांनी अफवा अथवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा मनात भीतीही बाळगू नये. ज्यांनी लस घेतली आहे, त्यांनी त्यांचे अनुभव इतरांना सांगून लस घेण्यास प्रेरित करावे.
- डाॅ. चेतन नाईकवार,
तालुका आराेग्य अधिकारी, रामटेक.