बेलानीच्या कार्यालयाची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:21 AM2019-06-26T00:21:31+5:302019-06-26T00:22:26+5:30
प्रतिबंधित ड्रग्स औषधाच्या रूपाने युरोप-अमेरिकेत निर्यात करणाऱ्या जितेंद्र बेलानी नामक व्यापाऱ्याला अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनने (एफबीआय) अटक केल्याचे वृत्त सर्वत्र खळबळ निर्माण करणारे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेलानीच्या सेंट्रल एव्हेन्यूवरील कार्यालयात झाडाझडती घेतल्याचे वृत्त आहे. त्यासंबंधाने या विभागाने बेलानीच्या नावाने एक नोटीस पाठवून औषध निर्मितीचे स्रोत विचारल्याचीही माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतिबंधित ड्रग्स औषधाच्या रूपाने युरोप-अमेरिकेत निर्यात करणाऱ्या जितेंद्र बेलानी नामक व्यापाऱ्याला अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनने (एफबीआय) अटक केल्याचे वृत्त सर्वत्र खळबळ निर्माण करणारे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेलानीच्या सेंट्रल एव्हेन्यूवरील कार्यालयात झाडाझडती घेतल्याचे वृत्त आहे. त्यासंबंधाने या विभागाने बेलानीच्या नावाने एक नोटीस पाठवून औषध निर्मितीचे स्रोत विचारल्याचीही माहिती आहे.
जरीपटक्यात राहणाऱ्या बेलानीचे सेंट्रल एव्हेन्यूवर कार्यालय आहे. गेल्या काही वर्षांपासून बेलानीने विशिष्ट प्रकारचे ड्रग्ज तयार करून ते देश-विदेशात विकण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. प्रतिबंधित असलेल्या युरोप, अमेरिकेत ही औषधे मोठ्या प्रमाणात बेलानी निर्यात करू लागला. भारतातून आयात होत असलेल्या प्रतिबंधित औषधांचा अमेरिकेत वापर वाढल्याने अमेरिकन तपास यंत्रणांनी या औषधांची तपासणी केली. प्रतिबंधित औषधांमधील कंटेन्ट (घटकद्रव्य) नाव आणि प्रमाण बदलून येत असल्याचे लक्षात येताच, हे औषध पाठविणाऱ्या निर्यातकांचा एफबीआयने पत्ता लावला. बेलानीचे नाव-पत्ता कळताच एफबीआयने बेलानीला समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, समन्सला बेलानीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने एफबीआयने बेलानीला जेरबंद करण्यासाठी सापळा लावला. त्याला एका औषध विक्रेत्याच्या माध्यमातून झेक रिपब्लिकनमध्ये बोलवून घेतले आणि तो निशांत सातपुते नामक साथीदारासोबत ३ जूनला पोहचताच त्याला एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. हे वृत्त सोमवारपासून उपराजधानीत वायुवेगाने पसरले. त्यामुळे बेलानीचे भागीदार आणि त्याच्याकडे काम करणारेही पळून गेले आहे. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेलानीच्या सेंट्रल एव्हेन्यूवरील कार्यालयात झाडाझडती घेतल्याचे समजते. बेलानीला एक नोटीस पाठवून हे औषध तयार करण्याचे, विकण्याचे आणि निर्यात करण्याच्या परवान्याबाबतही त्याला विचारणा करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
वकिलांचे पथक जाणार
१२ जुलैला बेलानीच्या अटकेच्या कारवाईच्या संबंधाने झेक रिपब्लिकनमधील न्यायालयात सुनावणी आहे. त्याची बाजू मांडण्यासाठी नागपुरातील वकिलांचे एक पथक कागदपत्रांसह पुढच्या आठवड्यात झेक रिपब्लिकनसाठी रवाना होणार असल्याची माहिती सबंधित सूत्रांनी दिली आहे.