बेलखोडेला केली होती सीबीआयने अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:08 AM2021-07-27T04:08:09+5:302021-07-27T04:08:09+5:30

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : झारखंडमधील हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप असलेला जयकुमार ...

Belkhode was arrested by the CBI | बेलखोडेला केली होती सीबीआयने अटक

बेलखोडेला केली होती सीबीआयने अटक

googlenewsNext

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : झारखंडमधील हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप असलेला जयकुमार बेलखोडे हा फोडाफोडीत मास्टर असून, त्याला सात वर्षांपूर्वी सीबीआयने अटक केली होती. लष्कराच्या भरतीचा लेखी पेपर फोडल्याचा त्याच्यावर आरोप होता.

झामुमो काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी आमदारांच्या खरेदी विक्रीचे प्रयत्न झाल्याची खळबळजनक माहिती उघड झाली असून, त्यात झारखंड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यातील अभिषेक दुबे नामक आरोपीने राची, तसेच दिल्लीत झालेल्या आमदारांच्या भेटीगाठी आणि कॅशडीलची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याने नागपुरातील भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (कोराडी), काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर आणि जयकुमार बेलखोडे (कारंजा, वर्धा) यांचीही नावे घेतली. त्यामुळे बेलखोडेचे नाव पुन्हा एकदा चर्चेला आले आहे. वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेला बेलखोडे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून काटोलनजीक टँगो चार्ली सैनिक प्रशिक्षण स्कूलच्या नावाने अकादमी चालवतो. तो नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी)मध्ये असिस्टंट कर्नल होता. निवृत्तीनंतर त्याने सैनिक प्रशिक्षण अकादमी सुरू केली. बेलखोडेचे सैन्य दलातील काही अधिकाऱ्यांशी घनिष्ट संबंध असल्याने, तो देशपातळीवर होणाऱ्या सैन्यदलाच्या लेखी परीक्षेत पास करून देण्याची हमी द्यायचा. परीक्षा केंद्रावर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे पुरविली जातील, असाही दावा करायचा. तो रोशन तिडके नामक दलालाच्या माध्यमातून लाखोंची रक्कम उमेदवाराकडून उकळत होता. त्याचे दलालाशी होणारे संभाषण आणि त्याच्या हालचाली त्यावेळी सीबीआयने रेकॉर्ड केल्या. भारतीय सेनेतर्फे ‘आर्मी जनरल ड्युटी’ (सैनिक, क्लर्क, टेक्निशियन) या पदासाठी २ फेब्रुवारी, २०१४ ला देशभरात एकाच वेळी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी विदर्भातील लाखो उमेदवार सहभागी झाले होते. येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या परीक्षा केंद्रावर पेपर सुरू झाल्यानंतर, सीबीआयचे तत्कालीन अधीक्षक संदीप तामगाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा घालण्यात आला होता. त्यावेळी लष्कराच्या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या आरोपात सीबीआयने जयकुमार बेलखोडेला साथीदारांसह अटक केली होती.

---

कारागृहातून आला अन् मालामाल झाला

सैन्य दलाचा पेपर फुटल्याच्या घटनेने त्यावेळी देशभर खळबळ उडाली होती. दरम्यान, काही दिवस कारागृहात राहिल्यानंतर बेलखोडे कारागृहातून परत आला अन् नंतर त्याची लाइफस्टाइलच बदलली. आलिशान वाहनात सतत नजरेस येणारा बेलखोडे माजी मंत्री बावणकुळेंच्या अत्यंत जवळचा असल्याची सर्वत्र चर्चा आहे. तो नेहमीच हवाई सफरीवर असल्याचीही चर्चा आहे. झारखंड सरकार पाडण्याच्या प्रयत्नात त्याचा काय रोल आहे, ते आता तपासले जात आहे.

---

Web Title: Belkhode was arrested by the CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.