अशी आहे घंटी कोड सिस्टीम : चार घंट्या वाजताच एसटी पोहोचते ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:29 AM2019-07-06T00:29:48+5:302019-07-06T00:31:14+5:30
बसने प्रवासाला निघाल्यावर प्रत्येकाला कंडक्टर वाजवितो त्या घंटीचा आवाज ऐकू येतो. वाहकाने वाजविलेल्या घंटीतील कोडच्या आधारावर चालक आपल्याला पुढे जायचे की काय याचा निर्णय घेतो. बसमध्ये असामाजिक तत्त्व वाद घालत असतील तर वाहक चालकाला काहीच न बोलता घंटीने इशारा करतो. घंटी ऐकल्यानंतर चालकही कोणताच प्रश्न न करता जवळच्या पोलीस ठाण्यात बस नेतो. एसटी महामंडळातील ही घंटी कोड सिस्टिम चालक-वाहकातील समन्वयासाठी महत्त्वाचा दुवा ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बसने प्रवासाला निघाल्यावर प्रत्येकाला कंडक्टर वाजवितो त्या घंटीचा आवाज ऐकू येतो. वाहकाने वाजविलेल्या घंटीतील कोडच्या आधारावर चालक आपल्याला पुढे जायचे की काय याचा निर्णय घेतो. बसमध्ये असामाजिक तत्त्व वाद घालत असतील तर वाहक चालकाला काहीच न बोलता घंटीने इशारा करतो. घंटी ऐकल्यानंतर चालकही कोणताच प्रश्न न करता जवळच्या पोलीस ठाण्यात बस नेतो. एसटी महामंडळातील ही घंटी कोड सिस्टिम चालक-वाहकातील समन्वयासाठी महत्त्वाचा दुवा ठरत आहे.
बसमध्ये बसल्यानंतर वाहकाने एकदा घंटी वाजविल्यास ती ऐकून चालक गाडी थांबवितो. दोन वेळा घंटी वाजविल्यास बस पुढे नेण्याची सूचना करण्यात येते. तीन वेळा वाजविल्यास मागून येणाऱ्या वाहनाला समोर जाण्यासाठी जागा द्यावी आणि चार वेळा घंटी वाजविल्यास बस पोलीस ठाण्यात नेण्याची, पाच वेळा घंटी वाजविल्यास बस रुग्णालयात नेण्याची सूचना करण्यात येते. ही घंटी कोड सिस्टीम एसटी महामंडळ सुरूझाल्यापासून सुरूअसून या सर्व बाबी चालक-वाहकांना प्रशिक्षण घेताना शिकविल्या जातात. त्याबाबत त्यांना अनुभव देण्यात येतो. एसटी महामंडळाने विकसित केलेली ही घंटी कोड सिस्टीम प्रवासात समन्वय साधण्यासाठी महत्त्वाची आहे.
रेल्वेतही हॉर्न कोडने साधतात समन्वय
रेल्वेने प्रवास करत असाल आणि लोकोपायलटने सलग लहान आवाजातील हॉर्न वाजविणे सुरू केले तर अपघात झाल्याची किंवा रेल्वे रुळावरून घसरल्याची सूचना समजावी. रेल्वेतही हॉर्न कोड असून लोकोपायलट कसा हॉर्न वाजवितो त्यावर समोरील परिस्थितीची माहिती गाडीचा गार्ड, टीसी आणि गाडीतील आरपीएफ जवानांना मिळते. लोकोपायलटने दोन लहान हॉर्न आणि एक लांब हॉर्न वाजविल्यास गाडीत चेन पुलींग झाली असल्याची सूचना देण्यात येते. रेल्वेगाडीला पुढे जाण्यासाठी सिग्नल मिळत नसल्यास लाँग हॉर्न, गेट क्रॉस करताना कुणी समोर येऊ नये यासाठी लाँग हॉर्न वाजविण्यात येतो. रेल्वेगाडी स्टेशनवरून सुटताना एक लहान हॉर्न आणि एक मोठा हॉर्न, सिग्नल खराब झाले आणि रेड सिग्नल सुरू असताना गाडी पुढे नेण्याची सूचना मिळाल्यास लहान हॉर्न, मोठा हॉर्न आणि लहान हॉर्न वाजविण्यात येतो. रेल्वेगाडी दोन रेल्वेस्थानकादरम्यान सेक्शनमध्ये उभी झाल्यास चार वेळा शॉर्ट हॉर्न वाजविण्यात येतो. या हॉर्नच्या आवाजावरून गाडीतील टीसी, गार्ड आणि आरपीएफ जवानांना संबंधित बाबीची कल्पना येते. त्यानुसार ते आपले कर्तव्य बजावतात.