सूर्योदयासोबतच मंदिरांची घंटा वाजली, भक्तांनी घेतले आराध्यांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 08:31 PM2021-10-07T20:31:15+5:302021-10-07T20:32:32+5:30
Nagpur News नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस म्हणून भक्त पहाटेपासूनच देवस्थानात पोहोचण्यासाठी सज्ज होते. सूर्योदय होताच, मंदिरांची घंटा वाजताच भक्तांनी मंदिरात प्रवेश केला आणि आराध्य देवतेचा जयघोष झाला.
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे कुलूपबंद झालेली देवस्थाने तब्बल दीड वर्षानंतर गुरुवारी सूर्याेदयापासून उघडण्यात आली. संक्रमणाचा ज्वर ओसरल्याची निश्चिती मिळताच शासकीय निर्देशानुसार मंदिर, गुरुद्वारा, विहार, मशीद, चर्चेसचे कपाट गुरुवारी उघडण्यात आले. आपल्या आराध्य देवतेच्या दर्शनापासून वंचित असलेल्या भक्तांसाठी हा क्षण डोळ्यात साठवून ठेवण्याइतपत महत्त्वाचा होता. कपाट उघडणार म्हणून सगळेच भक्त आसुसलेले होते. त्यातच नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस म्हणून भक्त पहाटेपासूनच देवस्थानात पोहोचण्यासाठी सज्ज होते. सूर्योदय होताच, मंदिरांची घंटा वाजताच भक्तांनी मंदिरात प्रवेश केला आणि आराध्य देवतेचा जयघोष झाला.
चीन, इटली आणि इतर देशांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर कोरोना संक्रमणाचा भारतात प्रवेश झाला आणि २० मार्च २०२० पासून संपूर्ण भारत लॉकडाऊन झाला. तेव्हापासून भक्तांसाठी देवस्थाने बंद होती. संक्रमणाचा झालेला उद्रेक, संक्रमणामुळे उसळलेली पहिली व दुसरी लाट आणि त्यामुळे उद्भवलेले संकट बघता, शासनाने व्यापार, उद्याेग, शिक्षणासह धार्मिक स्थळांना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून ते ६ ऑक्टोबरपर्यंत विविध मतावलंबियांची देवस्थाने बंदच होती. या काळात सर्वच धार्मिक आयोजनांवर मर्यादा आली होती. गुरुवारी ७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थाने अनलॉक झाली आणि देवस्थानांमुळे निर्माण होणाऱ्या धार्मिक चैतन्याचे उत्सर्जन होण्यास प्रारंभ झाला आहे.
सकाळी ५ वाजताच उघडले कपाट
श्री टेकडी गणेश मंदिर, कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर, गीता मंदिर, पारडी-पुनापूर येथील श्री भवानी माता मंदिर, श्री आग्याराम देवी मंदिर, महाल येथील श्री रेणुका माता मंदिर, वाठोडा गोपाळकृष्णनगर येथील श्री शितला माता देवस्थान यासह जवळपास सर्वच देवस्थानांची कपाटे सकाळी ५ वाजताच उघडण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कपाट उघडताच नैमित्यिक विधीविधानासोबतच पूजनास प्रारंभ झाला. घटस्थापना, अखंड ज्योत प्रज्वलन, आरतीने देवस्थाने उघडण्याचा सोहळा साजरा झाला.
मशिदीसह दरगाह दर्शनासाठी उघडले
मुस्लिम समुदयाची प्रार्थना स्थळेही गुरुवारी उघडण्यात आली. त्यात मोठा ताजबाग, छोटा ताजबाग, मिठा निम दरगाह, वाकी व अन्य दरगाह भक्तांसाठी सुरू झाले. यावेळी भक्तांमध्ये उत्साह दिसून येत होता. यावेळी भक्तांनी नमाज अदा करत सर्व मानवजातीच्या कल्याणाची प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी जुम्मा (शुक्रवार) असल्याने बांधव मशिदीमध्ये जाऊन सामूहिक नमाज पठण करणार आहेत.
कोरोना निर्देशिकांमुळे व्यवस्थापनाला अडचण
एकिकडे देवस्थाने उघडण्याची परवानगी देताना शासनाने कोरोना प्रोटोकॉल जाहीर केला आहे. या प्रोटोकॉलवर सर्वच देवस्थानांच्या व्यवस्थापनाने आक्षेप घेतला आहे. शिवाय, निर्माण होणाऱ्या अडचणींची व्यथाही सांगितली आहे. अशा स्थितीत देवस्थान व्यवस्थापनांनी शासकीय निर्देशांची सूचना यादीच प्रवेशद्वारावर ठेवली आहे. मात्र, पहिलाच दिवस असल्याने आणि दर्शन घेण्यास आसुसलेल्या भक्तांची स्थिती बघता, या निर्देशिका पाळणे कठीण जात होते. येणारे भक्त आणि व्यवस्थापनातील कर्मचारी सगळेच देवस्थाने उघडण्याचा सोहळा बघत होते आणि या सोहळ्यात तल्लीन झाले होते.
.............