बाबासाहेबांच्या वस्तूंचे होणार चिरकाल जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 12:34 PM2021-12-05T12:34:21+5:302021-12-05T12:45:29+5:30

डॉ. आंबेडकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण समारंभात वापरलेला ऐतिहासिक कोट व इतर कपडे विविध वस्तूंसह देशाच्या संविधानाचा मसुदा ज्या टाईपराइटरवर सर्वप्रथम तयार करण्यात आला होता, तो टाईपराइटर आदी अनेक ऐतिहासिक वस्तू आणि दस्तावेज शांतिवन चिचोली येथील संग्रहालयात ठेवल्या आहेत.

belongings that belongs to dr.babasaheb ambedkar's will be preserved forever | बाबासाहेबांच्या वस्तूंचे होणार चिरकाल जतन

बाबासाहेबांच्या वस्तूंचे होणार चिरकाल जतन

googlenewsNext
ठळक मुद्देरासायनिक प्रक्रिया : ३५० पेक्षा अधिक वस्तूंचा समावेश

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेला ऐतिहासिक कोट व इतर कपडे विविध वस्तूंसह ऐतिहासिक दस्तावेज आता चिरकाल जतन करून ठेवण्यात येत आहे. या संग्रहालयात बाबासाहेबांशी संबंधित जवळपास ३५० पेक्षा अधिक वस्तूंचा समावेश आहे.

देशाच्या संविधानाचा मसुदा ज्या टाईपराइटरवर सर्वप्रथम तयार करण्यात आला होता, त्या टाईपराइटरचाही यात समावेश आहे. ‘नॅशनल रिसर्च लेबोरेटरी फॉर कंझर्वेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टीज लखनऊ’ या केंद्र सरकारच्या संस्थेतर्फे या ऐतिहासिक वस्तूंवर नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयातील प्रयोगशाळेत रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत ९८ टक्के वस्तूंवर प्रक्रिया झाली आहे. या प्रक्रियेनंतर या वस्तू तब्बल १०० वर्षे टिकून राहणार आहेत, हे विशेष.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी कळमेश्वर रोडवर चिचोली या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील बौद्ध प्रशिक्षण केंद्र साकारण्याचा निर्णय घेतला. १९५७ मध्ये गोपिकाबाई बाजीराव ठाकरे या महिलेने त्यांना येथे ११ एकर जागा दान दिली. या जागेवर गोडबोले यांनी ‘शांतिवन’ उभारले. या परिसरातच त्यांनी एक छोटेखानी संग्रहालय उभारले. त्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण समारंभात वापरलेले कपडे, कोट, घरगुती कपडे, हॅट, छत्री, पेन, कंदील आदींसह दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंसह देशाच्या संविधानाचा मसुदा ज्या टाईपराइटरवर सर्वप्रथम तयार करण्यात आला होता, तो टाईपराइटर आदी अनेक ऐतिहासिक वस्तू आणि दस्तावेज शांतिवन चिचोली येथील संग्रहालयात ठेवल्या आहेत.

मागील काही वर्षांपासून देशाचा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला होता. कपड्यांना वाळवी लागणे सुरू झाले होते. तेव्हा शांतिवन चिचोली येथील भारतीय बौद्ध परिषदेने या वस्तूंचे जतन करण्यासाठी शासनाकडे मागणी केली. शासनाने ही मागणी मान्य करीत या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून त्याचे जतन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

- संग्रहालयाची भव्य इमारत उभी

शांतिवन चिचोलीसाठी सरकारने ४० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. यातून येथे भव्य वस्तुसंग्रहालय आणि शांती अतिथी गृह, तसेच मेडिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे. जवळपास सर्वच इमारती तयार झाल्या आहेत. परंतु, निधीअभावी अंतर्गत कामे रखडली आहेत. राज्य सरकारने उर्वरित निधी उपलब्ध करून दिल्यास सर्वच इमारती लोकांसाठी खुल्या करता येतील. महामानवाच्या वस्तू या नवनिर्मित संग्रहालयात लोकांसाठी उपलब्ध होतील.

संजय पाटील, कार्यवाह, भारतीय बौद्ध परिषद

Web Title: belongings that belongs to dr.babasaheb ambedkar's will be preserved forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.