प्रियकरा पाठोपाठ प्रेयसीचीही आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 07:13 PM2020-07-17T19:13:15+5:302020-07-17T19:16:54+5:30
प्रियकराने गळफास लावून आत्महत्या (दि. ९) केल्यानंतर प्रेयसीची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिच्यावर उपचार केले. हॉस्पिटलमधून सुटी झाल्यानंतर तिला घरी आणले. त्यातच तिनेही प्रियकराच्या आत्महत्येनंतर सात दिवसानी घरी गळफास लावून घेत जीवनयात्रा संपविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : प्रियकराने गळफास लावून आत्महत्या (दि. ९) केल्यानंतर प्रेयसीची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिच्यावर उपचार केले. हॉस्पिटलमधून सुटी झाल्यानंतर तिला घरी आणले. त्यातच तिनेही प्रियकराच्या आत्महत्येनंतर सात दिवसानी घरी गळफास लावून घेत जीवनयात्रा संपविली. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरिया येथे गुरुवारी (दि. १६) रात्री घडली.
अतुल भोजराज कोहळे (२२) व निकिता शेषराव गजभिये (२१) दोघेही रा. पिपरिया, ता. रामटेक अशी मृतांची नावे आहेत. दोघेही एकाच गावाचे रहिवासी असल्याने त्यांची आपसात ओळख होती. त्यांच्या याच ओळखीचे मैत्री आणि पुढे प्रेमात रुपांतर झाले. मात्र, त्यांच्या प्रेमप्रकरणाबाबत गावात कुणाला फारशी माहिती नव्हती, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
दरम्यान, अतुल गुरुवारी (दि. ९) रात्री १० वाजताच्या सुमारास घराबाहेर पडला. त्याचवेळी आत्महत्या करीत असल्याचे त्याने निकिताला फोनवर सांगितले. तो याआधी बरेचदा अशाप्रकारचे बोलल्याने तिने मनावर घेतले नाही. मात्र, त्याने त्या रात्री गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात गळफास लावून आत्महत्या केली. वन विभागात नोकरीला असलेल्या व्यक्तीला तो लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि बातमी गावात पसरली.
या घटनेमुळे निकिता अस्वस्थ झाली होती. शुक्रवारी (दि. १०) अतुलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि दुसरीकडे निकिताची प्रकृती खालावली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला लगेच रामटेक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. मंगळवारी (दि. १४) सुटी झाल्याने तिला कुटुंबीयांनी घरी आणले. त्यातच दोन दिवस घडलेल्या घडामोडीमुळे वडिलांनी तिच्याजवळ ‘तुझ्यामुळे पोलीस ठाण्यात जावे लागत आहे’ असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती.
त्यातच तिने गुरुवारी (दि. १६) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घरातील मंडळी बाहेर असल्याचे पाहून खोलीत दुपट्ट्याच्या मदतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्याने पोलिसांना सूचना देण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये देवलापार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सदर घटनांचा तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी घोडके करीत आहेत.