लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:09 AM2021-03-19T04:09:18+5:302021-03-19T04:09:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यात प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत हजाराे घरकुल मंजूर असल्याचे सांगून लाभार्थ्यांना शुभेच्छा पत्रेही देण्यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माैदा तालुक्यात प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत हजाराे घरकुल मंजूर असल्याचे सांगून लाभार्थ्यांना शुभेच्छा पत्रेही देण्यात आली. परंतु वर्षभराचा कालावधी उलटूनही एनएमआरडीएकडून मंजुरीपत्र न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे निधीसुद्धा उपलब्ध केला नसल्याने लाभार्थ्यांना घरकुलाच्या बांधकामासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.
मौदा तालुक्यात पहिल्या टप्प्यात सुमारे १,०७६, दुसऱ्या टप्प्यात ४,८५५ तर तिसऱ्या टप्प्यात सुमारे १,३०० घरकुल मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. दुसऱ्या टप्प्यातील असंख्य लाभार्थ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी शुभेच्छा पत्रे देण्यात आली. यामुळे लाभार्थ्यांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण हाेणार, अशी आशा पल्लवीत झाली. मात्र आता एक वर्षाचा कालावधी निघून गेला. एनएमआरडीएकडून अद्याप अधिकृत पत्र न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांची चिंता वाढली आहे. खंडाळा येथील काही लाभार्थ्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. जीर्ण घरे केव्हा पडतील याचा नेम नाही. यामुळे अनेकांना भाड्याच्या घरात वास्तव्य करावे लागत आहे.
जानेवारी ते मे महिन्यादरम्यान घराचे बांधकाम करण्याकरिता याेग्य मानले जाते. शिवाय, या कालावधीत शेतीची कामे कमी असतात किंवा संपली असतात. त्यामुळे बांधकामासाठी मजूर उपलब्ध हाेतात. मात्र शासनाने घरकुल बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला नसल्याने लाभार्थ्यांत नाराजी आहे. प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत घरकुलांसाठी केंद्र व राज्य शासनाने तातडीने निधी देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांच्याशी चर्चा केली असता, प्रधानमंत्री आवास याेजनेच्या निधीबाबत पालकमंत्री नितीन राऊत व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. याबाबत लवकरच ताेडगा काढला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.