जनआरोग्य योजनेतून ६२ हजार रुग्णांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:10 AM2021-09-15T04:10:49+5:302021-09-15T04:10:49+5:30
नागपूर : महात्मा जोतिबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६२ हजार ४४ रुग्णांना लाभ देण्यात ...
नागपूर : महात्मा जोतिबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६२ हजार ४४ रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. या एकत्रित जन आरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील २९ खासगी दवाखान्यांसह एकूण ३८ रुग्णालयांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.
राज्य शासनाची महात्मा जोतिबा फुले योजना तसेच केंद्राची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्यात येत असून त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील ३ लाख ३७ हजार ३०१ कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत १ हजार २०९ उपचार व १८३ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना ही राज्य शासनाची योजना असून यात केसरी, पिवळे तथा अंत्योदय आणि अन्नपूर्णा रेशनकार्डधारक पात्र लाभार्थ्यांचा समावेश आहे. या योजनेत प्रति कुटुंब प्रति वर्ष दीड लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा कवच देण्यात येते. या योजनेंतर्गत ३४ विशेष तज्ज्ञ सेवांतर्गत ९९६ प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे.