दिव्यांगांना घरकुलाचा लाभ
By admin | Published: February 22, 2016 03:07 AM2016-02-22T03:07:38+5:302016-02-22T03:07:38+5:30
दिव्यांग व्यक्तींमध्ये असणाऱ्या विशेष अंगभूत गुणांमुळे ते सामान्यांपेक्षा जास्त चांगली कामगिरी बजावू शकतात.
देवेंद्र फडणवीस : दिव्यांगांना आधुनिक साहित्य व उपकरणांचे वाटप
नागपूर : दिव्यांग व्यक्तींमध्ये असणाऱ्या विशेष अंगभूत गुणांमुळे ते सामान्यांपेक्षा जास्त चांगली कामगिरी बजावू शकतात. त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. दिव्यांग व्यक्तींना घरकूल योजनेसाठी दारिद्र्य रेषेखाली असण्याची अट शासनाने काढून टाकली आहे. त्यामुळे आता प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला घरकूल योजनेचा लाभ घेता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र राजस्व अभियान २०१५ अंतर्गत मध्य नागपूर व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, अपंग सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, महात्मा गांधी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी चिटणीस पार्क येथे दिव्यांग लाभार्थ्यांना नि:शुल्क आधुनिक साहित्य व उपकरण वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री
नितीन गडकरी होते. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. अनिल सोले, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांच्यासह दिव्यांग लाभार्थी आणि पालक उपस्थित होते. यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांना ११३३ प्रकारचे आधुनिक साहित्य व उपकरणांचे वाटप करण्यात आले. यामध्ये अंध व्यक्तींना डेझी प्लेअर्स, इलेक्ट्रॉनिक केन, ब्रेलकॅटस्चे वाटप करण्यात आले. तसेच कर्णबधीर आणि मतिमंद व्यक्तींकरिता व्हीलचेअर, आधुनिक श्रवणयंत्र, एमआर कीटस्चे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी २५० मोटराईज ट्रायसिकल लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आल्या. ही ट्रायसिकल बॅटरीवर चालणारी असून ती ४० किलोमीटरपर्यंत चालते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम राबविण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्याबाबत जिल्हा पातळीवर कार्यवाही सुरू आहे. सर्व दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना आधुनिक साहित्य आणि उपकरणे देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिव्यांगांना शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण तसेच आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.
नितीन गडकरी म्हणाले, समाजातील दिव्यांग लोकांची सेवा करण्याच्या दृष्टीने अशा कार्यक्रमाचे विशेष महत्त्व आहे. दिव्यांग व्यक्तींबद्दल संवेदनशील भावना जपणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. त्यांना सन्मानाने जगण्याचे पाठबळ मिळावे, यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्या योजनांचा आणि उपक्रमांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे ही सामाजिक जबाबदारी आहे. प्रास्ताविक जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले. प्रारंभी अंध विद्यालय, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूरच्या विद्यार्थ्यांनी स्वागतपर गीत सादर केले. या स्वागतपर गीताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. संचालन दिनेश मासोदकर आणि श्वेता शेलगावकर यांनी केले. बंडू राऊत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)