योजनांच्या नावावर वसुलीचा लाभ

By admin | Published: March 7, 2016 02:45 AM2016-03-07T02:45:06+5:302016-03-07T02:45:06+5:30

केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना घेता यावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार- प्रसार केला जात आहे.

Benefits of recovery in the name of schemes | योजनांच्या नावावर वसुलीचा लाभ

योजनांच्या नावावर वसुलीचा लाभ

Next

अर्ज विकणाऱ्या टोळ्या सक्रिय : भाजप, मनपा, नासुप्रकडून दखल
नागपूर : केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना घेता यावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार- प्रसार केला जात आहे. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थींही सरसावले आहेत. नेमका याचा गैरफायदा घेण्यासाठी काही टोळ्या सरसावल्या आहेत. काहींनी बनावट अर्ज छापून त्याची विक्री केली आहे तर काहींनी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाभार्थ्यांकडून पैसे उकळणे सुरू केले आहे. अशा प्रकारच्या तक्रारी गेल्या काही दिवसात भाजपचे पदाधिकारी, महापालिका व नासुप्रकडे आल्या आहेत. संबंधितांनी याची गंभीर दखल घेतली आहे.
केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक गरीब माणसाला हक्काचे घर दिले जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी, प्रचार, प्रसार करण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज महापालिकेत नि:शुल्क उपलब्ध आहेत. आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित अर्ज महापालिकेत नेमून दिलेल्या केंद्रावर जमा करून १०० रुपये शुल्क भरायचे आहे. महापालिकेतर्फे त्याची पावतीही दिली जाते. मात्र, काही असामाजिक तत्त्वांनी या योजनेचेही अर्ज छापले असून त्यांची २०० रुपयांना विक्री केली जात आहे. अर्ज विकताना याची जाहीर वाच्यता करू नका, जास्त लोकांना माहीत झाले तर तुमचा नंबर लागणार नाही, अशी ताकीद देऊन नागरिकांना चूप राहण्याचा सल्ला या भामट्यांकडून दिला जात आहे. गेल्या आठवड्यात अशा स्वरूपाच्या तक्रारी भाजपच्या आमदारांना प्राप्त झाल्या. आमदारांनी याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. पंतप्रधान आवास योजनेची प्रसिद्धी करावी, या योजनेच्या लाभासाठी नागरिकांनी कुठे संपर्क साधावा याची माहिती सर्वांना सहज उपलब्ध व्हावी, अशी मागणी केली. शिवाय अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून महापालिकेने जनजागृती मोहीम राबविण्याचीही मागणी करण्यात आली. नासुप्रतर्फे नंदनवन ले-आऊट येथे मॉडेल हाऊस बिल्डिंग उभारण्यात आली आहे. या घरांची किंमत बाजार किमतीच्या ४० टक्केच आहे. अशाच प्रकारची घरे स्वस्तात नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. संबंधित घरांच्या वाटपासाठी नासुप्रतर्फे रीतसर वर्तमानपत्रात जाहिरात दिली जाणार असून लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले जाणार आहेत. अद्याप नासुप्रने अर्ज मागविण्यासाठी कुठलीही जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही किंवा अर्ज स्वीकारण्यास सुरुवातही केलेली नाही. मात्र, काही असामाजिक तत्त्वांकडून संबंधित गाळ्यांसाठी अर्जांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. काहींनी तर लाभार्थ्यांना गाळे मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी एक-दीड लाख रुपये देण्याची मागणी केली आहे अशा तक्रारी नासुप्रकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत नासुप्रचे पथक कामी लागले असून संबंधितांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून स्वत:ची फसवणूक करून घेऊ नये. काहीही माहिती हवी असल्यास थेट नासुप्रशी संपर्क साधावा, असे आवाहन नासुप्रचे मुख्य अभियंता सुनील गुज्जलवार यांनी केले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Benefits of recovery in the name of schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.