विदर्भातील फुलपाखरांच्या यादीत बेंगाल फ्लिटरची भर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:08 AM2020-12-24T04:08:48+5:302020-12-24T04:08:48+5:30
नागपूर : गेल्याच आठवड्यात नागपुरात पॅंटाेपाेरिया म्हणजेच नाखवा या फुलपाखराची पहिल्यांदा नाेंद झाली असताना विदर्भाच्या यादीत आणखी एका फुलपाखराची ...
नागपूर : गेल्याच आठवड्यात नागपुरात पॅंटाेपाेरिया म्हणजेच नाखवा या फुलपाखराची पहिल्यांदा नाेंद झाली असताना विदर्भाच्या यादीत आणखी एका फुलपाखराची भर पडली आहे. बेंगाल ट्री फ्लिटर अशी या देखण्या जीवाची ओळख आहे. गडचिराेली जिल्ह्यात हेमलकसा येथे पहिल्यांदाच हे फुलपाखरू दिसून आले आहे. नागपूरच्या इन्सेक्ट अभ्यासकांच्या टीमला ते आढळून आले. या नाेंदीने विदर्भात फुलपाखरांच्या प्रजातींची संख्या १८७ वर पाेहचली आहे.
हेमलकसा येथील लाेकबिरादरी प्रकल्पातर्फे फुलपाखरू व ड्रॅगनफ्लाईज यांना केंद्रस्थानी ठेवून किटकांची जैवविविधता विषयावर कार्यशाळा आयाेजित केली हाेती. सेलू येथील महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागप्रमुख व किटकतज्ज्ञ डाॅ. आशिष टिपले, शाळा समन्वयक डाॅ. समीक्षा आमटे-गाेडसे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनघा आमटे, पर्यावरण तज्ज्ञ प्राची माहुरकर, प्रद्युम्न सहस्रभाेजनी, आशिष नागपूरकर यांचा सहभाग हाेता. दाेन दिवसांच्या कार्यशाळेदरम्यान हेमलकसा व आसपासच्या परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. या परिसरात जवळपास ४० प्रजातीचे फुलपाखरू, ३० प्रजातीचे ड्रॅगलफ्लाय तसेच तर किटक आढळून आल्याचे डाॅ. टिपले यांनी सांगितले. यातील सर्वात माेठी उपलब्धी म्हणजे बेंगाल ट्री फ्लिटर या फुलपाखराचा शाेध हाेय.
हे फुलपाखरू गडद चाॅकलेटी-तपकीरी रंगाचे असते. त्याच्या पंखांवर मधे माेठे व काठावर बारीक पांढरे ठिपके असतात. पंखांचा आतला भाग गडद तपकीरी तर बाह्य भाग हलका तपकीरी असताे. बाहेरील बाॅर्डरवर पांढऱ्या ठिपक्यांच्या दाेन स्ट्रीप असतात. पाेट, गळा ग्रे-ब्राउन तर पाय हे गडद तपकीरी असतात.
या भागात अधिवास
अंदमान-निकाेबार तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू राज्यांचा पश्चिम घाट, पूर्वाेत्तर भारत आणि उत्तराखंड, बंगाल या भागात बेंगाल ट्री फ्लिटरचा अधिवास आहे.