जलवाहिनी फुटल्याने नागपुरातील बेसा जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:28 PM2019-06-11T23:28:18+5:302019-06-11T23:33:35+5:30
नागपूर शहरालगतच्या बेसा गावासह ११ गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची जलवाहिनी फुटल्याने मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास बेसा परिसर जलमय झाला होता. बेसा गावात गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरालगतच्या बेसा गावासह ११ गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची जलवाहिनी फुटल्याने मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास बेसा परिसर जलमय झाला होता. बेसा गावात गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
नागपूर जिल्ह्यातील बेसा गावात पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते. अशा परिस्थितीत गावात सर्वत्र पाणी वाहत असल्याने या भागात मुसळधार पाऊ स झाल्याने घरात व दुकानात पाणी शिरावे अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार बेसा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून रस्त्याचे काम सुरू आहे. मंगळवारी काम सुरू असताना प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटली. काही वेळात परिसर जलमय झाला. लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत होते. यामुळे एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. जलवाहिनी नजिकच्या कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावरील दुकानात पाणी साचले. बँक ऑफ इंडियाच्या बेसा येथील शाखा, एटीएम, खासगी कार्यालयात पाणी साचले. जलवाहिनी फुटलेल्या परिसरातील पावसाळी नाल्या तुंबल्याने जलवाहिनीचे पाणी साचले. यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यालगतचा भाग तोडावा लागला.
डीपीमुळे पाण्यात वीज प्रवाह
जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणाजवळील कॉम्प्लेक्सच्या बाजूला अलेल्या डीपीत पाणी शिरल्याने पाण्यात वीज प्रवाह आला. याची जाणीव होताच विद्युत विभागाला सूचना देण्यात आली. थोड्याच वेळात वीज पुरवठा बंद करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
११ गावात जलसंकट
प्राधिकरणच्या पाणीपुरवठा योजनेतून बेसासह पसिरातील ११ गावांना पाणीपुरवठा होतो. यात बेसा, बेलतरोडी, घोगली, पिपला,बहादूरा, हुड़केश्वर खुर्द, गोमती-कामठी व अन्य गावांचा समावेश आहे. मंगळवारी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. यामुळे या गावांचा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांनी जलवाहिनीचा विचार न करता खोदकाम केल्याने ही घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले.