मेट्रोच्या डबल डेकर व्हायाडक्टला सर्वोत्कृष्ट बांधकाम पुरस्कार, ‘आयसीआय’ संस्थेतर्फे वितरण
By मोरेश्वर मानापुरे | Published: October 11, 2023 08:20 PM2023-10-11T20:20:33+5:302023-10-11T20:21:01+5:30
महामेट्रोने वर्धा मार्गावर बांधलेल्या ३.१४ किमी लांबीच्या डबल डेकर व्हायाडक्टला सर्वोत्कृष्ट संरचनेचा पुरस्कार मिळाला आहे.
नागपूर : महामेट्रोने वर्धा मार्गावर बांधलेल्या ३.१४ किमी लांबीच्या डबल डेकर व्हायाडक्टला सर्वोत्कृष्ट संरचनेचा पुरस्कार मिळाला आहे. महामेट्रोचे महाव्यवस्थापक (डिझाइन) राठोड यांना भारतीय काँक्रिट संस्थेतर्फे (आयसीआय) मुंबईत आयोजित कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय काँक्रिट संस्थेतर्फे बांधकाम क्षेत्रातील देशातील सर्वोत्कृष्ट बांधकामाची निवड करून संस्थेच्या आंतरराष्ट्रीय वार्षिक समारंभात पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. समारंभात देशविदेशातील बांधकाम क्षेत्राशी निगडित उद्योगांना विविध श्रेणींतर्गत पुरस्कार प्रदान करण्यात आले.
वर्धा मार्गावरील डबल डेकर अनोखा
वर्धा मार्गावर डबल डेकरचे बांधकाम हे एक अद्भूत उदाहरण आहे. या बांधकामाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या बांधकामात जमिनीच्या पातळीवर रस्ता, त्यावर डबल डेकर रस्ता आणि त्याच्यावर मेट्रो रेल्वे आहे. ऑरेंज लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो मार्गावर छत्रपतीनगर, जयप्रकाशनगर आणि उज्ज्वलनगर अशी तीन मेट्रो स्टेशन डबल डेकरवर बांधण्यात बांधण्यात आली आहेत. डबल डेकरच्या बांधकामामुळे वर्धा मार्गावरील वाहतूककोंडी पासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.