मनपाचे ‘बेस्ट इनोव्हेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:21 PM2018-05-18T23:21:21+5:302018-05-18T23:21:21+5:30
नागपूर महापालिकेच्या ‘स्मार्ट’ वाटचालीला स्वच्छता सर्वेक्षणात पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे.
नागपूर महापालिकेच्या ‘स्मार्ट’ वाटचालीला स्वच्छता सर्वेक्षणात पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. मनपाने राबविलेल्या ‘जीपीएस घड्याळा’च्या अभिनव उपक्रमाला ‘इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस’चा हा सन्मान ठरला आहे. देशपातळीवर झालेला हा गौरव नागपूरकरांचे आणि मनपाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे हे यश आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या चमूला महापालिकेने राबविलेला हा उपक्रम अतिशय आवडला. तत्कालीन मनपा आयुक्त व सध्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्वच्छता सर्वेक्षणादरम्यान मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘जीपीएस घड्याळां’चा उपक्रम राबविला होता. याशिवाय याच स्वच्छतेच्या उपक्रमांतर्गत उपराजधानीतील ५० हजारांच्या जवळपास नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड केले होते. ‘डोअर टू डोअर’ कचरा गोळा करण्यापासून तर रेल्वे, बस स्टॅँडपर्यंतची स्वच्छता सर्वेक्षणादरम्यान करण्यात आली होती. नागपूरची वाटचाल आता स्मार्ट दिशेने होत आहे. सिमेंट रोडचे चकाचक रस्ते, स्मार्ट दुभाजक, दुभाजकांचे सौंदर्यीकरण, एलईडी लाईट, स्मार्ट बसस्टॉप असे बदल होत आहेत. स्मार्ट शहराच्या दृष्टीने सर्वच उपाययोजनांवर भर दिला जात आहे. मागील स्वच्छता सर्वेक्षणात मनपाने पिछाडी घेतल्यानंतर यावेळी काहीतरी ‘इनोव्हेशन’ करण्याची संकल्पना पुढे आली आणि ‘जीपीएस घड्याळां’चा हा उपक्रम यशस्वी ठरला. इतर बाबतीतही नागपूरचे प्रदर्शन चांगले राहिले. यंदा स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात आली नाही. वेगवेगळ्या कॅटेगरीत पारितोषिकांची घोषणा झाली आहे. तब्बल ४२०३ शहरांमध्ये ही स्पर्धा होती. गेल्या वर्षी नागपूर मनपाला २००० गुणांपेकी ११५९ गुण मिळाले होते. त्याची एकूण टक्केवारी ५७.९५ टक्के इतकी होती. कचºयाचे कलेक्शन आणि वाहतुकीत नागपूरला ३६० पैकी २९३ गुण मिळाले होते. त्याची एकूण टक्केवारी ही ८१.३९ इतकी होती. केवळ पारितोषिकापुरते मर्यादित न राहता स्वच्छतेच्या दृष्टीने नागपूर मनपाला आणखी भरीव कार्य करण्याची गरज आहे. शहरातील अनेक भागात अजूनही अस्वच्छता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष पुढाकाराने नागपूरची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू आहे. त्यांच्या संकल्पनांना यशस्वीपणे राबविण्याची व शहर कायमस्वरुपी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी, मनपातील सत्ताधारी व विशेषत: नागपूरकरांनी घ्यायला हवी.