नागपुरात २० कोटींची सुपारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:54 AM2019-05-30T10:54:59+5:302019-05-30T10:58:20+5:30
इंडोनिशियातून अवैधपणे सुपारीची तस्करी करणाऱ्या नागपुरातील मनोज कोठारी नामक व्यापाऱ्यावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) कारवाई करीत जवळपास २० कोटी रुपयांचे १० सुपारीचे ट्रक ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडोनिशियातून अवैधपणे सुपारीची तस्करी करणाऱ्या नागपुरातील मनोज कोठारी नामक व्यापाऱ्यावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) कारवाई करीत जवळपास २० कोटी रुपयांचे १० सुपारीचे ट्रक ताब्यात घेतले. सर्व ट्रक नागपुरातून रायपूरला जात होते. अधिकाऱ्यांनी रस्त्यातच ट्रक जप्त केले. या तस्करीतून १० कोटींचा सीमा शुल्क बुडविण्याचा अंदाज आहे.
हलक्या दर्जाच्या सुपारीची आयात
नागपूर देशातील सुपारीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. इंडोनिशियातून सुपारीच्या आयातीवर १०८ टक्के सीमाशुल्क लागतो. पण सीमाशुल्क न भरता नागपुरात आणलेल्या सुपारीच्या विक्रीतून व्यापारी बक्कळ नफा कमवितात. त्यामुळे नागपुरातील अनेक व्यापारी सुपारीच्या तस्करीत गुंतले आहेत. जास्त नफा कमविण्याच्या उद्देशाने इंडोनिशिया आणि म्यानमार या देशातून अत्यंत कमी भावात सुपारी खरेदी करून समुद्रीमागे भारतात आणि नागपुरात आणतात. व्यापाऱ्यांना अत्यंत हलक्या दर्जाची सुपारी नागपुरात आणण्यासाठी प्रति किलो ५० ते ८० रुपयांपर्यंत खर्च येतो. सीमाशुल्काची चोरी करून नागपुरात २०० ते २५० रुपये भावाने विक्री करण्यात येते. पूर्वीही डीआरआयने नागपुरातील इतवारी भागातील ट्रान्सपोर्टर आणि व्यापाºयांवर कारवाई करून सुपारी तस्करीचे १० ट्रक जप्त केले होते. ही कारवाई बुटीबोरी, काटोल, कळमेश्वर टोल नाक्यावर करण्यात आली होती. मंगळवारच्या धाडीत सुपारीचा साठा जास्त असल्यामुळे कारवाई दोन दिवस सुरू राहणार आहे. कारवाईनंतर मनोज कोठारी या व्यापाऱ्यांसह अनेकांना ताब्यात घेतले आहे.
दरदिवशी कोट्यवधींचा व्यवसाय
नागपूर हे सुपारी तस्करीचे केंद्र झाले आहे. दरदिवशी अनेक ट्रक सुपारी विक्रीसाठी येते. सुपारी तस्करीतून दरदिवशी कोट्यवधींचा व्यवसाय होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपुरातून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भाच्या अनेक भागात सुपारीची विक्री करण्यात येते.
बुटीबोरीत अडीच कोटींचा गांजा जप्त
काही दिवसांपूर्वी डीआरआयने बुटीबोरी परिसरात कारवाई करून गांजाची तस्करी करणाऱ्यांकडून अडीच कोटी रुपयांचा गांजा जप्त केला होता. कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली होती. ओडिशा राज्यातून एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती डीआरआयला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचून बुटीबोरी परिसरातील बोरखेडी टोल नाक्याजवळ ट्रकच्या खालीत भागात तयार केलेल्या कप्प्यातून सुमारे अडीच कोटी रुपयांचा दीड टन गांजा जप्त केला होता.