सुपारी माफियांचा मध्य भारतात पुन्हा हैदोस; सडक्या सुपारीची जोरदार तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 08:00 AM2022-06-11T08:00:00+5:302022-06-11T08:00:01+5:30
Nagpur News उपराजधानीतील सुपारी माफियांनी मध्य भारतात पुन्हा नव्याने हैदोस सुरू केला आहे.
नरेश डोंगरे
नागपूर : उपराजधानीतील सुपारी माफियांनी मध्य भारतात पुन्हा नव्याने हैदोस सुरू केला आहे. अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करून हे माफिया महिन्याला कोट्यवधी रुपयांची हेरफेर करीत आहेत. दुसरीकडे लाखो निरपराध नागरिकांना घातक सडकी सुपारी खाऊ घालून त्यांना कॅन्सरच्या जबड्यात ढकलत आहेत.
इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, श्रीलंका आणि अशाच प्रकारचे सुपारीचे मोठे उत्पादक असलेल्या देशात कमी दर्जाची सुपारी खताच्या ढिगाऱ्यासारखी फेकून दिली जाते. उन, वारा, पावसात अनेक दिवस पडून राहिलेली ही सुपारी जागीच सडते. अशी ही घातक सुपारी त्या त्या देशातील दलालांच्या माध्यमातून दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि अन्य काही शहरालगतच्या बंदरावर दुसऱ्यांच्या नावाने आणली जाते. तेथून ही आरोग्यास घातक असलेली सडकी सुपारी नागपुरात पोहोचविली जाते. नागपुरात सडक्या सुपारीची भट्टी लावून प्रक्रिया केल्यानंतर ही सडकी सुपारी शुभ्र आणि टनक बनविली जाते. त्यानंतर ट्रकच्या ट्रक भरून ही सुपारी महाराष्ट्रातील विविध भागात आणि छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाणा आदी राज्यांत पाठविली जाते. या सुपारीची कटिंग करून त्यावर वेगवेगळी प्रक्रिया केली जाते. हीच सडलेली आणि आरोग्यास घातक असलेली सुपारी नंतर खर्रा, गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, मिठी सुपारी म्हणून आकर्षक पाऊचमध्ये भरून ग्राहकांना विकली जाते. अशा प्रकारे सडलेल्या सुपारीतून कोट्यवधींचा मलिदा लाटणारे सुपारी माफिया लाखो नागरिकांना कर्करोगासारख्या भयावह रोगाच्या जबड्यात ढकलतात.
सरकारलाही कोट्यवधींचा फटका
भारतात अशा प्रकारे अवैध मार्गाने सुपारी आणून कोट्यवधींची हेरफेर करणारे सुपारी माफिया शासनाचा कर चुकवून सरकारलाही कोट्यवधींचा फटका देतात. हे लक्षात आल्याने गेल्या वर्षी जून-जुलैमध्ये सीबीआयने नागपूरमधील ४ सुपारी व्यापाऱ्यांसह देशभरातील १९ व्यापाऱ्यांच्या गोदाम तसेच कार्यालयावर छापे घातले होते. नागपुरातील मोहम्मद रजा, अब्दुल गनी टॉवर्स, गुलाम फारूख नुरानी आणि हिमांशू बद्रा या चार व्यापाऱ्यांकडून त्यावेळी मोठी कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती. या कारवाईचे पुढे काय झाले ते कळायला मार्ग नाही.
कॅप्टन, अल्ताफ भोपाली, माैर्याची दहशत
नागपुरातून मध्य भारतात सडक्या सुपारीची तस्करी करणाऱ्यांमध्ये कॅप्टन अल्ताफ भोपाली, बंटी माैर्या, हारू आनंद, संजय पाटना, ईर्शाद गनी, वसीम बावला, आसिफ कलिवाला, चारमिनार यांची नावे घेतली जाते. गेल्या काही दिवसांपासून या सुपारी तस्करांनी प्रचंड हैदोस घातला आहे. मामा-भांजा या टोपण नावाने सुपारीची तस्करी करणारे राजा बेकरी, विक्की नागदिवेच्या माध्यमातून कोट्यवधींची हेरफेर करीत आहे. कारवाईचा अधिकार असलेल्यांपैकी अनेकांना तसेच गुन्हे शाखेच्या अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्याची माहिती आहे.
---