पाच महिन्यांपासून गायब सुपारी व्यापारी सापडला, अपहरण झाल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 02:38 PM2023-10-04T14:38:17+5:302023-10-04T15:03:55+5:30

अंगावर सिगारेटच्या चटक्यांच्या खुणा : कर्जाच्या वसुलीतून प्रकार झाल्याचा संशय

Betel nut trader missing for five months found, claims to be kidnapped | पाच महिन्यांपासून गायब सुपारी व्यापारी सापडला, अपहरण झाल्याचा दावा

पाच महिन्यांपासून गायब सुपारी व्यापारी सापडला, अपहरण झाल्याचा दावा

googlenewsNext

नागपूर : मागील पाच महिन्यांपासून गायब असलेल्या सुपारी व्यापाऱ्याचा अखेर शोध लागला आहे. संबंधित व्यापारी नंदुरबारमध्ये सापडला असून त्याने त्याचे अपहरण झाल्याचा दावा केला आहे. व्यापाऱ्याच्या शरीरभर सिगारेटच्या चटक्यांच्या खुणा असून पाच महिने प्रचंड छळ झाल्याची तक्रार व्यापाऱ्याने केली आहे. या प्रकारामुळे पोलिसदेखील हैराण झाले असून यामागे नेमका काय प्रकार आहे याचा तपास सुरू आहे.

नानक सुहारानी असे संबंधित व्यापाऱ्याचे नाव आहे. नानकवर अनेकांचे कर्ज झाले होते व त्यातून अनेकदा धमक्यादेखील येत होत्या. मे महिन्यात नानक पैसे आणण्यासाठी गुजरातला गेले होते. नानकच्या दाव्यानुसार तेथून परत येत असताना २० मे रोजी शेगावजवळून तीन तरुणांनी अपहरण केले व नंदुरबारला नेले. तेथे त्यांनी प्रचंड छळ केला व एका खोलीत कोंडून ठेवले होते. ते अनेकदा मारहाण करायचे व शरीरावर वाट्टेल तेव्हा सिगारेटचे चटके द्यायचे. दोन दिवसांअगोदर संधी साधत नानकने तेथून पळ काढला व एका स्थानिक व्यक्तीच्या मदतीने नंदुरबारच्या पोलिस ठाण्यात पोहोचला. तेथून नानकने नागपुरातील त्याच्या पत्नीला संपर्क केला. पत्नीने लकडगंज पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस व पत्नीने तेथे जाऊन त्याला परत आणले. नानकच्या पत्नीने यामागे काही सुपारी व हवाला व्यापारी असल्याचा आरोप लावला आहे. त्यांनी लकडगंज पोलिस ठाण्यात मे महिन्यात नानक गायब झाला असल्याची तक्रारदेखील दिली होती.

नानकवर होते कर्ज

नानकवर अनेक व्यापाऱ्यांचे कर्ज झाले होते व त्यावरून अनेकदा धमक्या यायच्या. गुजरातला जाण्याच्या दोन दिवस अगोदरदेखील नानकला एका व्यापाऱ्याने धमकी दिली होती. नानकविरोधात फसवणुकीचे दोन गुन्हेदेखील दाखल आहे.

तहसील पोलिसांनी घेतले ताब्यात

नानकला फसवणुकीच्या गुन्ह्यात तहसील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय लकडगंज पोलिस ठाण्यातदेखील नानकविरोधात गुन्हा दाखल आहे. अपहरण झाल्याच्या दाव्यात किती तथ्य आहे याची चौकशीदेखील पोलिस करत आहेत. त्याचा दावा किती खरा आहे याचीदेखील चाचपणी करण्यात येत आहे, अशी माहिती लकडगंजचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांनी दिली.

Web Title: Betel nut trader missing for five months found, claims to be kidnapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.