वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी बचाव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:09 AM2021-09-22T04:09:04+5:302021-09-22T04:09:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जात आहेत. लिंगनिदान बंदीसारखे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जात आहेत. लिंगनिदान बंदीसारखे कडक कायदेही आहेत. जनजागृतीही जोरात सुरू असली तरी मुलांपेक्षा मुलींचे गुणोत्तर प्रमाण मात्र कमीच आहे. एवढेच नाही तर, नागपुरात अलीकडे एक टक्क्याने घटलेले दिसत आहे.
नागपूर महानगर पालिका क्षेत्रामध्ये २०१७ मध्ये मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे ९३.४० टक्के होता. २०१९ मध्ये ९५.२९ वर पोहचला होता. मात्र आता जुलै-२०२१ पर्यंत तो ९२.६९ टक्क्यांवर आला आहे. ही घट फार अधिक नसली तरी मुलांपेक्षा मुलींचे गुणोत्तर प्रमाण कमीच असल्याचे आकडेवारी सांगत आहे.
...
हजार मुलांमागे मुली किती?
२०१७ - ९३.४०
२०१८ - ९४.०४
२०१९ - ९५.२९
२०२० - ९३.६४
२०२१ (जुलैपर्यंत) - ९२.६९
...
मुलामुलींच्या जन्माची संख्या
वर्ष : मुले : मुली
२०१७ : २९,०३९ : २७,१२२
२०१८ : ३०,०९१ : २८,२९७
२०१९ : २७,६०६ : २६,३०६
२०२० : २३,२२८ : २१,७५०
२०२१ (ऑगस्टपर्यंत) : ११,०७० : १०,२६१
...
लिंगनिदानास बंदी
कायद्यानुसार शहरात लिंगनिदानाला बंदी आहे. महानगर पालिका क्षेत्रात या प्रकारावर नियंत्रण राखण्यासाठी सरकारच्या निर्देशानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या नियमित बैठका होऊन केंद्रांची तपासणी करण्यासंदर्भात तसेच संयंत्रांच्या वापरासंदर्भात परवानगी दिली जाते. अलीकडे अशा स्वरूपाची तक्रार नसल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
...
कोट
महानगर पालिका क्षेत्रात मुलामुलींच्या गुणोत्तर प्रमाणात मुलींच्या जन्म दरात घट दिसत असली तरी ती फक्त एक टक्का आहे. आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहे. जनजागृतीवर भर दिला जात असून लिंगनिदान बंदीची कठोर अंमलबजावणी केली जात आहे.
- डॉ. संजय चिलकर, वैद्यकीय अधिकारी, मनपा, नागपूर
...