प्रेयसीने दगा देणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे : नागपूर खंडपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 10:47 AM2021-10-18T10:47:38+5:302021-10-18T18:32:55+5:30
प्रेयसीने दगा देणे, प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवून प्रेयसीविरुद्धचा वादग्रस्त एफआयआर रद्द केला.
नागपूर : प्रेयसीने दगा देणे, प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवून प्रेयसीविरुद्धचा वादग्रस्त एफआयआर रद्द केला. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.
या प्रकरणातील तरुण प्रणय मोरे व करिना (काल्पनिक नाव) यांचे २०१८ पासून एकमेकांवर प्रेम होते. दरम्यान, करिना २०१९ मध्ये एअर होस्टेस ट्रेनिंगकरिता लखनऊला गेली होती. त्यावेळी ती दुसऱ्या मुलावर प्रेम करायला लागली असा संशय प्रणयला आला. त्यावरून त्याने करिनाला टाेकले होते.
करिनाने तिचे दुसऱ्या मुलावर प्रेम नसल्याचे स्पष्ट करून प्रणयची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला होता. परंतु, प्रणयचे समाधान झाले नाही. १२ फेब्रुवारी २०२० रोजी करिना लखनऊ येथे एअर होस्टेसची मुलाखत देऊन नागपूरला आली होती. येथून प्रणय तिला कळमेश्वर येथील स्वत:च्या खोलीवर घेऊन गेला. प्रवासामुळे थकलेली करिना गाढ झोपी गेल्यानंतर प्रणयने गळफास लावून आत्महत्या केली. त्यामुळे कळमेश्वर पोलिसांनी २३ जानेवारी २०२१ रोजी करिनाविरुद्ध प्रणयला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा एफआयआर दाखल केला होता. करिनाने त्या एफआयआरच्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे तिला दिलासा दिला. करिनातर्फे ॲड. अमृता गुप्ता यांनी कामकाज पाहिले.