मोसमी वाऱ्यांनी दिला दगा, राज्यात कुठे कमी, तर कुठे जास्त पाऊस...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 07:09 AM2021-09-07T07:09:13+5:302021-09-07T07:09:38+5:30
जुलै ते ऑगस्टदरम्यान १०० टक्के पावसाचा अंदाज होता. पण मोसमी वाऱ्यांनी दगा दिला आणि पर्जन्यमानावर परिणाम झाला. परतीचा पाऊस चांगला पडण्याची अपेक्षा असली तरी येत्या वर्षात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल की काय अशी एकंदर स्थिती आहे
गोपालकृष्ण मांडवकर
नागपूर : पावसाच्या असमतोलाने यंदा गणित बिघडवले आहे. सप्टेंबर उजाडला तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने सरासरीही गाठलेली नाही. अनेक मध्यम आणि छोट्या धरणांचे काठ रिकामे आहेत. लघु प्रकल्पांत तर जेमतेम १८ टक्केच पाणी आहे.
जुलै ते ऑगस्टदरम्यान १०० टक्के पावसाचा अंदाज होता. पण मोसमी वाऱ्यांनी दगा दिला आणि पर्जन्यमानावर परिणाम झाला. परतीचा पाऊस चांगला पडण्याची अपेक्षा असली तरी येत्या वर्षात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल की काय अशी एकंदर स्थिती आहे. राज्यात आतापर्यंत कोकणात १२ टक्के, मध्य महाराष्ट्रात ९ टक्के, मराठवाड्यात १९ टक्के अधिक पाऊस पडल्याची नोंद आहे. विदर्भात मात्र १४ टक्के पाऊस कमी आहे.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस
वाशिम, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मुंबई उपनगर, चंद्रपूर, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली.
सरासरीपेक्षा कमी पाऊस
बुलडाणा, अकोला, अमरावती, ठाणे, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदूरबार, पुणे, मुंबई शहर.
सरासरीइतका पाऊस : रायगड, पालघर.
असमतोल पावसाची कारणे काय?
n यंदा मान्सून विलंबाने आला.
n मोसमी वाऱ्यांची दिशा वारंवार बदलत राहिली.
n बंगालच्या खाडीत अपेक्षित दबाव निर्माण झाला नाही.
n इंडियन ओशन ड्रायकोल्ड निगेटिव्ह असल्याने कमी पाऊस.
n समुद्राकडून येणारे मोसमी वारे यंदा अनुकूल नाहीत.
या महिन्यात चांगला पाऊस
यंदा अंदाज चुकले. मान्सून ब्रेक झाला. बंगालच्या खाडीत महिन्यात किमान ४ वेळा निर्माण होणारा दबाव २ वेळा तयार झाला. इंडियन ओशन ड्रायकोल्ड अद्याप निगेटिव्हच आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला राहील. - दामोदर पायी, प्रमुख,
क्लायमेट रिसर्च अँड सर्विसेस, आयएमडी, पुणे
जमिनीचे तापमान अनिश्चित झाले आहे. कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर निर्माण व्हायला हवे. ते बदलत असल्याने आर्द्रता तयार होत नाही. शहरीकरण, निर्वनिकरण, प्रदुषण वाढीमुळे भिन्न तापमानाचे क्षेत्र तयार झाले. - सुरेश चोपणे,
पर्यावरण अभ्यासक तथा अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी.