दोन भावांकडून नातेवाईकाचाच विश्वासघात; जेथे नोकरी दिली तेथेच ७.७३ कोटींचा ‘गोलमाल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 08:57 PM2023-06-14T20:57:59+5:302023-06-14T20:58:27+5:30
Nagpur News दोन भावांनी त्यांना नोकरी देणाऱ्या नातेवाईकाचाच केसाने गळा कापला व विश्वासघात करत ७.७३ कोटींचा गोलमाल केला. हा प्रकार उघडकीस आल्यावर भावांनी ४ कोटींहून अधिकची रक्कम परत केली आहे.
नागपूर : दोन भावांनी त्यांना नोकरी देणाऱ्या नातेवाईकाचाच केसाने गळा कापला व विश्वासघात करत ७.७३ कोटींचा गोलमाल केला. हा प्रकार उघडकीस आल्यावर भावांनी ४ कोटींहून अधिकची रक्कम परत केली आहे. मात्र, उर्वरित पैसे अद्यापही दिलेले नाहीत. या भावांनी नातेवाइकाच्या फर्ममधील कामगारांचे पीएफ व ईएसआयसीचे पैसेदेखील उडविले. तसेच बोगस फर्म स्थापन करून अपहार केला. वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आर्थिक गुन्हे शाखेतर्फे तपास सुरू आहे.
अमीन खारवा (६२, राजनगर) यांनी यासंदर्भातील तक्रार दिली आहे. त्यांचा मुलगा यासीर याने २००७ मध्ये नागपुरात प्राईम लॉजिस्टिक नावाच्या फर्मची स्थापना केली. ती फर्म ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’साठी सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करते. खारवा यांनी फर्मच्या आर्थिक व्यवहारांचे काम नातेवाईक असलेल्या फरहान मलिक (३२, काटोल मार्ग, जाफरनगर) याच्याकडे सोपविले होते. त्याचा मोठा भाऊ आरिफ मलिक हा फर्ममध्येच गोडावून कीपर म्हणून काम करत होता. खारवा यांनी त्यांच्या नातेवाइकांच्या नावाने आणखी १४ फर्म सुरू केल्या होत्या व त्याच्या आर्थिक ताळेबंदाचे कामदेखील फरहानकडेच होते. २०१३ पासून तो हे काम सांभाळत होता.
२०२१ मध्ये त्याने फर्म सोडली व तो ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या कोलकाता येथील कार्यालयात रुजू झाला. तो तेथून या सर्व फर्मच्या पीएफ व ईएसआयसीची कामेदेखील पाहत होता. जुलै २०२२ मध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये त्याने अपहार केल्याची बाब उघड आली. कंपनीच्या अंतर्गत चौकशीतून त्याने खारवा यांच्या फर्ममध्येदेखील गैरव्यवहार केल्याचे समोर आले. त्याने त्याच्या नावावर चार फर्म स्थापन केल्या व बोगस बिले तयार करून प्राईम लॉजिस्टिकच्या खात्यातून ४.७१ कोटी स्वत:च्या खात्यात वळते केले. त्यानंतर सर्व पैसा चार फर्मच्या बॅंक खात्यात वळता केला. याशिवाय त्याने इतर १४ फर्मपैकी काहीमध्ये गैरव्यवहार करत एकूण ७.७३ कोटींचा अपहार केला. खारवा यांनी त्याला विचारणा केली असता त्याने गुन्हा कबूल केला व ४.६२ कोटी परत केले. मात्र, उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अखेर खारवा यांनी वाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी फरहान व आरिफ मलिकविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
खोट्या सह्या मारून फसवणूक
फरहानने खारवा तसेच फर्मच्या इतर प्रोप्रायटर्सच्या खोट्या सह्या मारून कामगारांच्या पीएफ व ईएसआयसीचे पैसेदेखील स्वत:च्या खात्यात वळविले. यासाठी त्याने इन्सेट इन्शुरन्स लिमिटेड नावाची बनावट कंपनीदेखील तयार केली होती. त्याने भारत एन्टरप्रायजेस नावाची बोगस फर्म तयार करून बोगस बिलाच्या माध्यमातून तेथून रक्कम वळती केली. त्याने बोगस जीएसटी चालानदेखील बनविले होते.
भावाच्या खात्यातदेखील पाठविले पैसे, २२ ट्रक्सची खरेदी
फरहानने त्याचा भाऊ आरिफ याच्या खात्यात वेळोवेळी पैसे वळते केले. त्याने २.२६ कोटी पाठविले होते. तसेच आरिफने २.२५ कोटींचे २२ ट्रक्सदेखील खरेदी केले. ते पैसेदेखील फर्मच्या खात्यातून वळते केलेले होते.