स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूर शहरात चोख बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:34 PM2018-08-13T22:34:07+5:302018-08-13T22:35:15+5:30
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. नुकतीच मुंबई एटीएसने केलेली कारवाई लक्षात घेता पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी यावेळी प्रथमच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चार पातळींवर बंदोबस्ताची व्यूहरचना केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. नुकतीच मुंबई एटीएसने केलेली कारवाई लक्षात घेता पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी यावेळी प्रथमच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चार पातळींवर बंदोबस्ताची व्यूहरचना केली आहे.
मुंबई पोलिसांनी नुकतीच छापामार कारवाई करून मोठ्या प्रमाणावर गावठी बॉम्ब, देशी पिस्तूल आणि स्फोटके जप्त केली. अटक करण्यात आलेल्यांकडून ठिकठिकाणी घातपात घडवून आणण्याची माहिती पुढे आल्यामुळे सर्वत्र अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला. नागपूर हे आधीपासूनच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. येथे दीक्षाभूमी, संघ मुख्यालय, कामठीचे गार्ड रेजिमेंट सेंटरसह महत्त्वपूर्ण आणि अतिसंवेदनशील स्थळे आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दहशतवादी येथे घातपात किंवा दंगल घडवून आणू शकतात, हे ध्यानात घेत सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खबरदारीच्या उपाययोजनांबद्दल त्यांना निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर, दीक्षाभूमी, संघ मुख्यालय, विधानभवन, विमानतळ, रेल्वेस्थानक, न्यायालय, विभागीय आयुक्त कार्यालयासह अतिमहत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला.
शीघ्र कृती दलाच्या जवानांना २४ तास दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत दिवस आणि रात्रीची गस्त वाढविण्याच्याही सूचना करण्यात आल्या. समाजकंटक शहरात शिरू नये म्हणून ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली. संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाली दिसल्यास तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
असा आहे बंदोबस्त
४० ठिकाणी नाकेबंदी
१०३ ठिकाणी फिक्स पॉर्इंट
ठिकठिकाणी क्यूआरटी, आरसीपी आणि साध्या गणवेषातील पोलीस
व्यक्तींसोबत वाहनांचीही तपासणी, शहरातील सर्व डीसीपी रस्त्यावर
आम्ही सज्ज आहोत : डॉ. उपाध्याय
शहराला कोणत्याही प्रकारचा धोका किंवा धमकी नाही. मात्र, ऐनवेळी कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही स्थिती निर्माण झाल्यास आम्ही कारवाईसाठी सज्ज आहोत, असे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले. नागरिकांनीही कायद्याचे पालन करावे. रॅलीत गोंधळ करू नये किंवा डीजे वाजवू नये, सतर्क राहून स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करावा, असे आवाहन डॉ. उपाध्याय यांनी केले.