"समृद्धीवर अपघात होऊ नयेत म्हणून उत्तम तंत्रज्ञान वापरणार; महत्वाकांक्षी प्रकल्पाला अफवांचे गालबोट नको"
By कमलेश वानखेडे | Published: July 21, 2023 05:23 PM2023-07-21T17:23:22+5:302023-07-21T17:24:09+5:30
दादा भुसे यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी
नागपूर : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अविकसित भागाच्या समतोल विकासाचा राजमार्ग आहे. जगातल्या उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून या महामार्गावर अपघात होणारच नाहीत, अशा पद्धतीच्या उपाययोजना करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शुक्रवारी पहिल्या नागपूर भेटीत दादा भुसे यांनी समृद्धी महामार्गाच्या संदर्भातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दोन तास विचारमंथन केले. यानंतर प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावर जाऊन पाहणी करीत त्यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला.
भुसे यांनी समृद्धी महामार्गाच्या झिरो पॅाईंट तसेच वायफळ टोलनाक्याची पाहणी करीत दौ-याला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी समृद्धी महामार्गाची माहिती मंत्री भुसे यांना दिली. यात कंट्रोल रुम, वाहनाला आग लागल्यास आग प्रतिबंधात्मक सयंत्र, शीघ्र कृती दल वाहन, वाहनांची टोलनाक्यावर करण्यात येणारी तपासणी, प्रवाशांसाठीचे समुपदेशन केंद्र, ॲम्ब्युल्सची पाहणी केली. यावेळी मंत्रीमहोदयांना आग्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. या महामार्गावर अपघात झाल्यास प्रतिसाद देणारी ॲम्बुलन्स १५ मिनिटाच्या आत पोहोचते. हा कमाल कालावधी आणखी १० ते १२ मिनिटावर आणण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
या रस्त्याची पाहणी झाल्यानंतर काही धोरणे ठरविण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने करा. नियमाने चालणारे वाहन चालक, उद्योग व्यापार क्षेत्रातील दिग्गज रस्त्याचे कौतुक करतात. त्यामुळे प्रसंगी कडक शिस्त लावण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही. तपासण्याही आवश्यकतेनुसार वाढवण्यात येतील. मात्र यापुढे विभागाने अपघात शून्य महामार्ग ही संकल्पना घेऊन जोमाने कामाला लागावे, असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. जवळपास २० हजार वाहने रोज या रस्त्याचा वापर करत आहे. या रस्त्याची सकारात्मक बाजूही जनतेपुढे आली पाहिजे. केवळ अफवांमुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गालबोट लागतात कामा नये. त्यामुळे दीर्घकालीन व अल्पकालीन उपाययोजना उद्यापासून रस्त्यांवर अमलात आल्या पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
‘ओव्हरस्पीड’ मध्ये जाणाऱ्या चालकाचे समुपदेशन
- महामार्गावर १२०गतीमर्यादा निश्चित केली आहे. मात्र ही गती ओलांडणाऱ्यांना थांबवून त्यांचे टोल नाक्यांवर समुपदेशन करण्यात येते. मंत्री महोदयांच्या दौऱ्या दरम्यान एका वाहन चालकाचे समुपदेशन सुरु होते. मंत्र्यांनी या चालकाला गती मर्यादा पाळण्याचे आवाहन केले.