सावध व्हा, नागपूर जिल्ह्यात ५९ ‘कंटेन्मेंट झोन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 10:11 AM2021-02-24T10:11:02+5:302021-02-24T10:11:24+5:30
Nagpur News नागपूर शहर व ग्रामीण भाग मिळून सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यात ५९ ‘कंटेन्मेंट झोन’ आहेत. त्यांचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ करण्यासोबतच ‘आरटीपीसीआर’ व ‘अँटीजेन’ तपासणीची संख्या वाढवावी, असे निर्देशही विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून ‘कंटेन्मेंट झोन’ची संख्यादेखील वाढते आहे. शहर व ग्रामीण भाग मिळून सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यात ५९ ‘कंटेन्मेंट झोन’ आहेत. त्यांचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ करण्यासोबतच ‘आरटीपीसीआर’ व ‘अँटीजेन’ तपासणीची संख्या वाढवावी, असे निर्देशही विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबतचा आढावा त्यांनी घेतला.
या बैठकीला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आर. पी. सिंग, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, उद्योग सहसंचालक धर्माधिकारी उपस्थित होते.
बंद झालेली ‘कोविड’ केंद्र परत सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो तसेच महानगरपालिकेच्या रुग्णालयांचे ‘सेफ्टी’ व ‘फायर ऑडिट’ तत्काळ करण्यात यावे. . प्रशासनाने कोरोना रुग्णांसाठी अतिरिक्त सुविधा निर्माण केल्या आहेत. संबंधित इमारतींचेही ‘फायर’ व ‘सेफ्टी ऑडिट’ बंधनकारक आहे. त्यासाठी लागणारा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अथवा जिल्हा नियोजन विकास निधीमधून उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी अतिरिक्त निधीची मागणीसुध्दा प्राधान्याने करावी, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी बैठकीत दिले.
कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंचा शोध वाढविणे आवश्यक आहे. परंतु ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’चे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची प्राधान्याने तपासणी करण्यात यावी. त्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व आरोग्य विभागाने संयुक्त मोहीम राबवून एका व्यक्तीमागे संपर्कात आलेल्या किमान दहा ते पंधरा लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करावी, असे निर्देशही यावेळी विभागीय आयुक्तांनी दिले.
ऑक्सिजन, औषधांसाठी नियोजन करा
जिल्ह्यात ‘कोरोना’ रुग्णांवर उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या सर्व रुग्णालयात ऑक्सिजनसह आवश्यक औषधांचा मुबलक पुरवठा असावा, यासाठी नियोजन करावे. जिल्ह्यात विविध शासकीय व खासगी रुग्णालयात एक हजारपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असून, रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन त्याप्रमाणे नियोजन करणे आवश्यक असल्याचे महानगरपालिका आयुक्तांनी सांगितले.
पोलीस-मनपाने संयुक्त मोहीम राबवावी
नियमांचे सक्तीने पालन करताना ग्रामीण अथवा शहरी भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही. तसेच प्रत्येकाने सक्तीने मास्कचा वापर करावा. यासाठी पोलीस व महानगर पालिकेने संयुक्त मोहीम राबवावी, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.