खबरदार! दररोज २१ जणांचे लचके तोडतात कुत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2023 08:52 PM2023-04-11T20:52:55+5:302023-04-11T20:53:20+5:30
Nagpur News महापालिकेच्या आरोग्य विभागानेच दिलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरात ७,९४४ लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या आकडेवारीनुसार रोज २१ लोकांना कुत्रा चावा घेत आहे.
नागपूर : उपराजधानीत कुत्र्यांची संख्या २ लाखांवर झाल्याचे पशुचिकित्सा क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांचे मत आहे. या मोकाट कुत्र्याच्या अतिरेकी दहशतीचा सामना नागपूरकर करीत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागानेच दिलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरात ७,९४४ लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या आकडेवारीनुसार रोज २१ लोकांना कुत्रा चावा घेत आहे.
गेल्या काही वर्षांपासून मोकाट कुत्र्यांची नसबंदी ठप्प असल्यामुळे बेवारस कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शहरातील लोकसंख्येचा विचार केला, तर १५ लोकांमागे एक भटका कुत्रा असल्याचे प्रमाण आहे. शहरात कुत्र्यांची खरी दहशत रात्री अनुभवायला मिळते. रस्त्यावर कुत्र्यांच्या झुंडी असतात. हे कुत्रे इतके आक्रमक झाले की, वाहनांवर समूहाने अतिरेक्यासारखे हल्ले करतात. कुत्र्यांच्या दहशतीमुळे लहान मुलांना, वृद्धांना पायी चालणे धोक्याचे झाले आहे. मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही ताशेरे ओढले आहेत. महापालिकेने कुत्र्याच्या नसबंदीसाठी १७ कोटी रुपयांची मागणी सरकारकडे केली आहे. त्याला मंजुरी मिळाली असून, मनपाला अजूनही निधी प्राप्त झाला नाही. कुत्र्यांच्याच एका प्रकरणात महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ.गजेंद्र महल्ले यांनी न्यायालयापुढे लेखी माफीही मागितली होती. मोकाट कुत्र्यांचा विषय नागरिकांसाठी दहशत निर्माण करणारा आहे.
- आता प्रत्येक झोनला एक कुत्रा पकडणारी व्हॅन
शहरात मोकाट कुत्र्यांची वाढलेली संख्या व कुत्र्यांच्या चाव्यामुळे जखमी झालेल्यांची संख्या लक्षात घेता, महापालिकेने प्रत्येक झोनसाठी कुत्रा पकडणारी एक व्हॅन खरेदी केली आहे, परंतु मनपा प्रशासकांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कुत्र्यांच्या नसबंदीसाठी कुठलीच तरतूद नाही. कुत्रे पकडूनही नसबंदीला गती मिळत नाही, तोपर्यंत व्हॅन खरेदी करून काहीच उपयोग होणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
- मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत असे होते न्यायालयाचे आदेश
१) नागरिकांना भटक्या कुत्र्यांविषयी तक्रार करता यावी, याकरिता महानगरपालिकेने ट्विटर, व्हॉट्सॲप इत्यादी समाज माध्यमांवर सुविधा उपलब्ध करून द्यावी. नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी.
२) धोकादायक कुत्र्यांना ठार मारणे, त्यांची नसबंदी करणे व त्यांना शेल्टर होममध्ये ठेवणे, याविषयी कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींचे काटेकोर पालन करावे. याशिवाय, पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक यांनी या संदर्भात मुंबई पोलिस कायद्यांतर्गत कारवाई करावी.
३) कायदा व न्यायालयाच्या आदेशांच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भटके कुत्रे नियंत्रणाकरिता व्यापक जनजागृती करावी.